आणखी काही संशयित रडारवर,होणार चौकशी

नाशिक : शहरात गुन्हेगारी वाढलेली असताना आता पोलीस ऍक्शन मोडवर आले आहेत काही दिवसांपूर्वी पंचवटी परिसरातील राहुलवाडी भागात सागर जाधव नामक व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 13 संशयितांना गजाआड करण्यात यश मिळविले आहे. मात्र या कटाचा मुख्य म्होरक्या विकी उत्तम वाघ (34, रा फुलेनगर)हा संशयित घटनेनंतर फरार होता. मात्र पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने विकी वाघ याच्या मुसक्या आवळल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गुंडाविरोधी पथकाचे राजेश राठोड यांना गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांची दोन वेगवेगळी पथके तयार करण्यात आली एका पथकाने वणी गाठले तर दुसऱ्या पथकाने लखमापूर फाट्यावर सापळा रचला होता. यादरम्यान विकी वाघ हा दुचाकीने लखमापूर फाट्याकडून कोशिंबे गावाच्या दिशेने जात असताना पथकाने त्याचा पाठलाग सुरू केला यादरम्यान कोशिंबे गावात त्याला पकडण्यात आले. त्याचा अंग झडतीतून गावठी पिस्तुल जप्त करण्यात आले. मुख्य म्हणजे राहुलवाडीत गोळीबार करून फरार झालेला विकी वाघ हा दुचाकीने अहिल्यानगर, पुणे, संभाजीनगर या जिल्हामध्ये प्रवास करत होता त्यामुळे पोलिसांना त्याचा ठावठिकाणा मिळत नव्हता. या गोळीबारात आणखी काही संशयितांची नावे पुढे आली आहेत. गोळीबारापूर्वी व घटना घडल्यानंतर संशयित आरोपींसोबत मोबाईलवर वेळोवेळी झालेले बोलण्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत त्यांचीही चौकशी केली जाणार आहे. त्याचबरोबर मखमलाबाद परिसरातून संशयित दीपक वीर यास पंचवटी गुन्हे शोध पथकाने बेड्या ठोकल्याने आता संशयित आरोपींची संख्या 15 वर पोहचली आहे. यामध्ये भाजपचे माजी नगरसेवक संशयित जगदीश पाटील यांनीही कटात सहभागी असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण,सहा पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते,अंमलदार मलंग गुंजाळ,विजय सूर्यवंशी,सुनील आडके,प्रदीप ठाकरे,अक्षय गांगुर्डे,गणेश भागवत, राजेश राठोड,कल्पेश जाधव, घनश्याम महाले,दयानंद सोनवणे,सुनीता कवडे यांनी केली.

![]()












