नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका

नाशिक : महाराष्ट्रच्या राजकारणात ठाकरे गटाची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची चर्चा सुरू असतानाच आज नाशिक शहरातील राजकारणाला नवे वळण लागल्याची सुरवात बघावयास मिळाली असून आज नाशकात पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी हातात-हात घालत भाजपा विरोधात रणशिंग फुंकत जनआक्रोश मोर्चा काढला. मुख्य म्हणजे या विशाल मोर्चाचे नेतृत्व शिवसेना खासदार संजय राऊत आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले. मोर्चात मनसैनिक आणि शिवसैनिकांनी हातात काळे झेंडे घेऊन सरकार विरोधात निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली. हा संयुक्त मोर्चा शहरातील प्रमुख चौकांमधून काढण्यात आला, या मोर्चातील प्रमुख मुद्दे शहरातील वाढती गुन्हेगारी,शहरात ड्रग्जचा झालेला शिरकाव,कोयता गँगच्या कारवाया, वाहनांची तोडफोड, महिलांवरील अत्याचार, चेन स्नॅचिंगच्या घटना त्याचबरोबर महानगरपालिकेतील जमीन अधिग्रहण प्रक्रियेत भ्रष्टाचार, स्मार्ट सिटी प्रकल्पातील अनियमितता आणि शहरातील खड्ड्यांची समस्या ,शेतकऱ्यांची आत्महत्या, पाण्याची टंचाई आदी होते.मोर्चा दरम्यान भ्रष्टाचार, गुन्हेगारी, कोयता गँग, जुगार, एमडी ड्रग्स अवैध धंदे असे विविध प्रात्यक्षिक कार्यकर्त्यांकडून सादर करण्यात आले.या मोर्चात नाशिककर देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यान सेना-मनसे नेत्यांनी नाशिक दत्तक घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. हा मोर्चा आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. मोर्चात मनसे नेते बाळा नांदगावकर, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, मनसे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर, मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे, खासदार राजाभाऊ वाजे, मनसे सरचिटणीस दिनकर पाटील, शिवसेना संपर्क नेते दत्ता गायकवाड, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे माजी आमदार वसंत गीते, सलीम शेख, अंकुश पवार, शिवसेना जिल्हाध्यक्ष डी जी सूर्यवंशी, ऋषी वर्मा, धीरज भोसले, प्रवीण जाधव आकाश खोडे,मनोज घोडके, बंटी कोरडे,जावेद शेख संदेश फुले, मसूद जीलानी आदींसह कार्यकर्ते व महिला या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

तुमचा एक नगरसेवक खून करून फरार होतो -संजय राऊत या मोर्चात बोलताना संजय राऊत म्हणाले राहुल धोत्रेचा फोटो पाहून मी मगापासून अस्वस्थ आहे. राहुल धोत्रे सारख्या तरुण मुलाची हत्या करण्यात आली.त्याची हत्या देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्ता, गिरीश महाजनांच्या कार्यकर्त्याने केलेली आहे. कुठे गेला हा उद्धव निमसे? तुमचा एक नगरसेवक खून करून फरार होतो. त्याला कोण वाचवत आहे? हे जर राज्याच्या गृहमंत्र्यांना आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांना माहीत नसेल तर तुम्ही राज्य करायला लायक नाहीत असा घणाघात त्यांनी यावेळी केला.मनसे व उबाठा या दोन्ही पक्षाचे कुळ आणि मूळ एकच आहे. यापुढे नाशिकचे आणि राज्यातील सर्व कार्यक्रम संयुक्त होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

नाशिकला दत्तक घेतले होते त्या नाशिकला काय मिळाले ? –बाळा नांदगावकर केंद्रात तुमचे सरकार, गल्लीत तुमचे सरकार आहे. त्यामुळे नाशिककरांनी तुमच्यावर विश्वास टाकला की काहीतरी चांगलं होईल. पण, इथले उत्तम प्रकारचे प्रकल्प बंद केले आणि लोकांच्या तोंडाला पानं पुसायचं काम तुम्ही केले असा हल्लाबोल त्यांनी भाजप सरकारवर केला. रक्ताचे नाते आणि कधी संपत नाही. आम्ही पूर्वी शिवसैनिक होतो आणि आता मन सैनिक आहोत. नाशिकमधील हा मोर्चा तर सुरूवात आहे यापुढे मोठे तुफान येणार आहे. ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला तर नाशिक दणाणून सोडले आहे.जर राज ठाकरे-उद्धव ठाकरे आले तर तुमचे काय होईल विचार करा, असे म्हणत नांदगावकर यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे.

![]()












