शहराला बदनाम करणारे खरे चेहरे समोर आले पाहिजेत.

हनीट्रॅप प्रकरण महाराष्ट्रात घडलं मात्र बदनाम नाशिक झालं, या बदनामीच्या वाहत्या गटारीत एकमेकांचे स्वार्थ साधण्यासाठी अनेकांना बदनाम करण्यात आल.खर तर नाशिक आणि ठाणे, पुणे या ठिकाणी ज्या हनीट्रॅपच्या घटना घडल्या त्या मुळात वेगवेगळ्या, मात्र शासकीय सेवेतील 72 अधिकारी अडकले ते नाशिकमध्ये, असा मेसेज पसरवला गेला. मुख्य म्हणजे 72 पैकी 70 अधिकारी मुंबई व ठाणे परिसरातील असून त्याचा नाशिकशी काडीमात्र संबंध नसताना सर्व घडले ते नाशिकमध्येच, असे दाखवण्यात आले खर तर जीएसटीचे सहायक आयुक्त, दोन सहायक पोलिस आयुक्त, दोन पोलीस निरीक्षक, दोन उत्पादन शुल्क अधिकारी, एक सहायक पोलिस निरीक्षक अश्या बड्या सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार ठाण्यातील बडतर्फ होमगार्ड महिला अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली. त्याचबरोबर यातील दोन अधिकाऱ्यांनी आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार या महिलेने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलीस महासंचालक यांच्याकडे केली.मात्र ही महिला तक्रारी करत ब्लॅकमेल करीत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांच्या वकिलांचे म्हणणे आहे. ठाण्याच्या या प्रकरणाचा नासिक मधील हानी ट्रॅपच्या प्रकरणाशी सुतराम संबंध नसल्याचे ठाणे पोलीस म्हणत आहेत. मात्र सोशल मीडियावर पडीक असलेले व पत्रकारांच्या आधी बातमी देण्याची स्पर्धा करणाऱ्या आंबटशौकिनानी सरळ सरळ या प्रकरणाचा संबंध नाशिकबरोबर जोडत नाशिकला बदनाम करण्याची एकही संधी सोडली नाही. या आंबटशौकिनानी तर काही फेसबुकवरील फोटोंचा, व्हिडीओचा शोध घेत ते व्हायरल केले. मुळात जी माहिती पोलिसांकडे नाही. ती माहिती सोशल मीडियावर पडीक असलेल्या महाभागांकडे आधी पोहचते .यावर कढी म्हणजे काही महाभागांनी पॉर्न साईडवरील क्लिप काढत त्या व्हायरल करत त्याचा संबंध या हनीट्रॅप बरोबर जोडला. आता राहिला नाशिकचा प्रश्न यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस स्वता म्हणाले हा प्रकार अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांशी संबंधित असून एका राजकीय महिलेच्या विवाहबाह्य संबंधात बाधा आल्याने त्यांनी एकमेकांविरोधात पोलिसात अर्ज दिला नंतर त्यात तडजोड झाल्याने ते अर्जही मागे घेतले. गेले मुळात हा विषय सहा महिन्यांपूर्वीचा असताना तो आताच का पुढे आला ? तो कोणी आणला ? हे पोलिसांनी तपासणे गरजेचे आहे. त्याचबरोबर त्या महिलेने व संबंधित अधिकाऱ्याने ज्या हॉटेलचा वापर केला ते हॉटेल व हॉटेलचा मालक प्रकाशझोतात आले. मुख्य म्हणजे ती मोठी असामी, मोठ्या घरातील व्यक्तिमहत्व, राजकारणात अनेक वर्षांपासूनचे प्रस्थ,या हॉटेलमध्ये अनेक मंत्री, राजकीय नेते थांबत असतात. मुख्य म्हणजे या मनसे प्रमुख हे देखील याच हॉटेलमध्ये थांबत असतात. मात्र आता यासंदर्भात इतक्या अफवा पसरवल्या जात आहे की त्याबाबत कुठलेही पुरावे नसताना फक्त सोशल मीडियावर बसून जे फेकता येईल तितके फेकण्याचा प्रकार सुरू आहे. या ठिकाणी छुपे कॅमेरे होते, मग ते इतक्या कोटींचे होते, ते खास चायना वरून मागवले होते. या सारख्या एक ना अनेक गोष्टी पसरवल्या जात आहेत.आता मिळालेल्या माहितीनुसार या हॉटेलची चौकशी एका पोलीस पथकामार्फत करण्यात आली. यामध्ये काही मिळून आले तर यावर विश्वास ठेवता येईल अन्यथा ही केवळ बदनामीच ठरेल.याबाबत कोणाजवळही पुरावा नाही. मात्र काही लोक इतक्या तन्मयतेने या घटना सोशल मीडियावर पसरवत आहेत की त्या हनीट्रॅप च्या व्हिडीओचे शूटिंग याच महाभागांनी केले. आता या घटनेला अनेक किनारे देखील आहेत. मध्यंतरी नाशिकच्या अनेक बड्या बिल्डरांवर पोलिसांनी आयुक्तालयाची जमीन फसवणुकीद्वारे लाटल्याचा आरोप करून गुन्हे दाखल केले. यामुळे नाशिक चर्चेत आले खर तर हे प्रकरण जुने होते मात्र अचानक वायूवेगाने हे प्रकरण समोर आले आणि याची चर्चा सुरू झाली तर या प्रकरणात देखील त्याच हॉटेल मालकाचा संबंध जोडण्यात आला होता. आणि आत्ताच्या हनीट्रॅप प्रकरणात देखील त्याच व्यक्तीचा नाव आल्याने हा योगायोग तर नक्कीच नसावा.त्याचबरोबर शहरातील काही उद्योजक, अधिकारी, व्यावसायिक यानिमित्ताने आपआपली खुन्नस काढण्याचा प्रयत्न करत असून यामध्ये साम, दाम, दंड, भेद, राजकारण सर्व अवलंबले जात असल्याची चर्चा आहे. यामध्ये मीडिया मधील महाभाग देखील मागे नाहीत. मुख्य म्हणजे या हनीट्रॅप प्रकरणाचे राजकारण सुरू झाले असून विरोधी पक्ष यावर आक्रमक दिसत आहे. विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित झाला यामध्ये कॉग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात पेनड्राईव्ह दाखवला तर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नाशिकच्या हनी ट्रॅपची सीडी आमच्याकडे असल्याचा दावा केलाय. मात्र काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश करताना एकनाथ खडसे यांनी देखील आपल्याकडे सीडी असल्याचा दावा केला होता मात्र आजपर्यंत ती सीडी बाहेर आलीच नाही. पण राजकीय नेत्यांच्या बोल- बच्चनमुळे सामान्य नागरिकांचा त्यांच्यावरचा विश्वास उडत चालला आहे. असेल सीडी किंवा पेनड्राईव्ह तर जनतेसमोर उघड करावा आणि त्या उच्चशिक्षिताचा चेहरा जनतेसमोर आणावा.कारण या हनीट्रॅप चा वापर करून सरकारी अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून कामे करून घेणे हे सर्व खतरनाक असून जर यामध्ये खरच हॉटेलमालक असेल तर त्याची चौकशी, त्या महिलेशी चौकशी त्या अधिकाऱ्यांची चौकशी करून घडलेली सर्व माहिती निवेदनाद्वारे सरकारने जाहीर करायला हवी. जेणेकरून दूध का दुध आणि पाणी का पाणी होईल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील या हनी ट्रॅप ची सखोल चौकशी करावी. कारण बाईचा वापर करून लाजलज्जा सोडत आपल्या स्वार्थासाठी अशी प्रकरणे करण्यात येत असतील तर ते नक्कीच भविष्यात घातक ठरणार आहे. आणि यातील खरे चेहरे उजेडात आणलेच पाहिजे. मात्र जर हा सापळा ठरवून केलेला असेल तर त्यात कितीजण अडकणार ते काळच ठरवेल. आज महाराष्ट्रात जनतेचा नाशिककडे पहाण्याचा दृष्टिकोन बदलला असून यापुढे हॉटेल व्यवसाय अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हल्ली राजकारणासाठी एकाद्याला संपवण्याची भाषा देखील होऊ लागली आहे. त्यासाठी सर्व हातखंडे वापरले जाऊ लागले आहेत. कोण कोणाला कोणत्याप्रकारे बदनाम करेल हे सांगता येणे कठीण होऊन बसले आहे. त्याचबरोबर आता अधिकारी एकमेकांशी बोलताना सावध पवित्रा घेत आहे. मात्र या हनीट्रॅपच्या मुद्यामुळे नाशिक महसूलमधील दोन अधिकाऱ्यांविरोधात असलेल्या तक्रारी अन त्यांच्यावरील कारवाई मागे पडली.असे किती तरी मुद्दे या मुद्यांमुळे बाजूला पडले गेले असो इगतपुरीच्या धुक्यात पक्षाचे शिबीर संपले मात्र त्या नेत्याने पत्रकारांनबरोबर अनौपचारिक गप्पा मारताना हनी ट्रॅपचा मुद्दा काढला आणि इगतपुरी मधून सुटलेला हनी ट्रॅप महाराष्ट्रात पसरला. मात्र नाशिक यामध्ये बदनाम झाले. हा मुद्दा आत्ताच का चर्चेत आला ? मीडियाला हे खाद्य कोणी पुरवले ? सोशल मीडियावर फोटो व्हिडीओ कोणी व्हायरल केले ? जर ती महिला, अधिकारी, हॉटेलमालक दोषी असतील तर कारवाई का नाही ? हे सर्व प्रश्न अनुउत्तरीत असून भविष्यात त्याची उत्तरे मिळतील का हे सांगणे अवघड आहे मात्र बदनामीच्या या वाहत्या पाण्यात सर्वच स्वार्थ साधत आहे आणि एकमेकांना बदनाम करत आहेत मात्र यामध्ये स्वतःचे शहर बदनाम झाले याची जाणीव कोणालाही होत नाही हे विशेष…..


![]()












