अज्ञात कारचालक फरार

नाशिक : किराणा घेण्यासाठी वडिलांबरोबर दुचाकीवर पाठीमागे बसून घरातून निघालेल्या एका युवतीचा परतीच्या प्रवासात मोटारीच्या धडकेत गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाल्याची वेदनादायक घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार नांदूरनाका परिसरातील रहिवासी असलेले शांताराम निमसे हे त्यांची मुलगी अनुष्काला (वय 16,रा मांडसांगवी) सोबत घेऊन किराणा दुकानात गेले. सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान हे बापलेक दुचाकीने घरी येत असताना जत्रा चौफुलीकडून लिंकरोड मार्गे नांदूरनाक्याच्या दिशेने प्रवास करत असताना पाठीमागून भरधाव जाणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत दोघेही बाजूला फेकले गेले यादरम्यान दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनुष्काच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तिच्या मेंदूत रक्तस्राव झाला. त्या दोघांनाही दुसऱ्या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले उपचार सुरू असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अनुष्का हिला मयत घोषित केले या प्रकरणी आडगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अनुष्काने नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत 92 टक्के गुण मिळविले होते. तिच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

![]()












