आजपासून पाणीपट्टीचे स्पॉट बिलिंग

नाशिक : शहरात पाणीपट्टीची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे महापालिकेने पाणीपट्टी बिल वाटपाचे खाजगीकरण केले असून नळकनेक्शनच्या सर्वेक्षणाची जबाबदारी ‘कॅनबेरी’ या मक्तेदार कंपनीला देण्यात आली आहे. या कंपनीमार्फत आजपासून (दि 28 सोमवार ) स्पॉट बिलिंग ला सुरवात केली जाणार आहे. त्याचबरोबर मीटरचे रिडींग घेऊन अप्लिकेशनद्वारे संबंधित नळ कनेक्शन धारकास स्पॉट बिलिंग बरोबर ई-मेल व मोबाईलवरही बिले दिली जाणार आहेत. घरपट्टीची वसुली मोठ्याप्रमाणात होत असताना पाणीपट्टीची वसुली मात्र कमी झाली आहे. त्याचबरोबर कर विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे नागरिकांपर्यंत पाणीपट्टीचे बिल पोहचत नाही. शहरातील 40 टक्के पाण्याचा महापालिकेला हिशेब लागत नाही. यामुळे पाण्याचा अपव्यय, होणारी चोरी, गळती थांबविण्यासाठी महापालिकेला उपाययोजना करणे गरजेचे होते. त्यानुसार महापालिकेने 1 एप्रिलपासून यापुढील पाणीपट्टीची दर तिमाही बिले वाटप केली जाणार आहेत. त्यामुळे वेळेत बिले मिळतील त्याचबरोबर आतापर्यंत मोघम बिले दिली जात होती मात्र यापुढे रिडींग करूनच पाणीपट्टीचे बिल दिले जाणार आहे. त्याचबरोबर यापुढे कोणाकडे पाणी मीटर आहे की नाही हे तपासले जाणार असून मीटर नसेल तर 15 दिवसांचा अवधी दिला जाईल त्यानंतर दंडात्मक कारवाई केली जाईल


![]()















