कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद बचावले असून कोकाटे यांना ठोठावलेल्या 2 वर्षाच्या शिक्षेप्रकरणी नाशिक सत्र न्यायालय आज दिलासादायक निर्णय दिला आहे.राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून पहिल्या दिवसापासून विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्यासह राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. त्यावरुन सभागृहात मोठा गदारोळही झाला. अखेर 85 दिवसांनंतर मस्साजोग येथील संरपच संतोष देशमुख हत्याप्रकरणात काल धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. राज्यपालांनी त्यांचा राजीनामा मंजूरही केला. तर दुसरीकडे राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक सेशन कोर्टाने त्यांच्यासह त्यांच्या बंधूंच्या शिक्षेला स्थगिती दिली आली. त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदावरचं संकट टळलेलं दिसत आहे.माणिकराव कोकाटे यांना नाशिक कोर्टाने दिलासा दिला असून कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली. लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा सुनावल्यास त्याचं सभागृहाचं सदस्यत्त्व रद्द होते. कायद्यानुसार कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली नसती तर त्यांना आमदारकी व मंत्रिपदावर पाणी सोडावे लागले असते. नेमकं प्रकरण काय —-1995 चे हे प्रकरण असून कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी आर्थिक दुर्बल घटकातील असल्याचे दाखवून मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छा निधीतील 10 टक्के आरक्षित सदनिका मिळवली होती. या सदनिका लाटण्यासाठी त्यांनी कागदपत्रांत फेरफार केल्याचा आरोप होता. तर याप्रकरणी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेनंतर सरकारवाडा पोलिसांत कोकाटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तब्बल 29 वर्षांनी या प्रकरणात नाशिक कोर्टाने निकाल दिला. त्यात कोकाटे व त्यांच्या भावला २ वर्षांच्या तुरुंगवासाची आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र आता या शिक्षेला ही स्थगिती मिळाली आहे.

![]()















