उद्या नागपुरात होणार मंत्रिपदाचा विस्तार,फरांदे, डॉ आहेर, ढिकले यांचे नाव चर्चेत

नाशिक : विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण आणि हिंदुत्वाच्या जोरावर महायुतीने बहुमत मिळवत राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करण्यात यश मिळविले. गेल्या आठवड्यात आझाद मैदानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. इतर मंत्र्यांचा शपथविधी रविवारी (दि 15) रोजी नागपुर मध्ये होणार आहे. मात्र भाजप कडून नाशिक जिल्ह्यात कोणाला मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. नाशिकमध्ये अँड राहुल ढिकले, सीमा हिरे, देवयानी फरांदे यांनी विरोधकांना चितपट करत बाजी मारली असून डॉ राहुल आहेर यांनी देखील मैदान मारल्याने या सर्वांचीच नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. यामध्ये डॉ राहुल आहेर आणि देवयानी फरांदे यांचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत असल्याचे समजते सुरवातीला महायुतीच्या सरकारमध्ये नाशिक जिल्ह्यातून दोन मंत्रिपद होती आता नवीन सरकारमध्ये हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासाठी आमदारांनी फिल्डींग लावली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या शिवसेनेकडून दादा भुसे आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे. तर मंत्रिपदाच्या स्पर्धेत अँड माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवळ, सुहास कांदे यांच्या नावाची देखील चर्चा आहे. त्याचबरोबर सन 2027 मध्ये नाशकात सिहस्थ असल्याने मंत्रिपदाला मोठे महत्व प्राप्त झाले असून महायुती मधील सर्वच पक्ष मंत्रिपदासाठी आग्रही आहेत. त्यामुळे भाजप मध्ये मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे उद्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात कळेलच.मिळालेल्या माहितीनुसार मंत्रिपद ज्यांना दिले जाणार आहे त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी (आज) दुपारनंतर फोन करण्याची शक्यता असून तुम्हाला शपथ घेण्यासाठी यायचे आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतरच मंत्रिपद मिळणार हे नक्की मानले जाणार आहे.

![]()












