अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री वाटून घेण्याची शक्यता

नाशिक : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक झालेला विजय आणि महायुतीने दणदणीत विजय मिळविल्यानंतर आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार ? याचीच चर्चा रंगली आहे.महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी संबंधित सर्वांशी चर्चा करतील आणि यावर अंतिम निर्णय घेतील असे भाजपमधील वरिष्ठ नेते सांगत आहेत. 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच महायुतीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव निश्चित केले होते. तर उपमुख्यमंत्रीपदी फडणवीस यांची वर्णी लागली होती. मात्र आता परिस्थिती बदलली असून काही दिवसांपूर्वी झालेल्या एका बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्देशून महत्वाचे विधान केले होते. मुख्यमंत्रीपदावेळी आम्ही त्याग केला, आता तुम्ही झुकते माप घ्या, असा सल्ला अमित शाह यांनी एकनाथ शिंदेना दिला. सध्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. त्याचबरोबर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी उत्सुक आहेत. त्याचबरोबर ज्या पक्षाचे संख्याबळ मोठे त्यांचा मुख्यमंत्री असा फार्मूला असू शकतो. काय शक्यता असू शकतात — 1)भाजप महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्यामुळे भाजपकडे मुख्यमंत्री पद जाऊ शकते आणि पर्यायाने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात . 2) एकनाथ शिंदे यांनी शिवसेना विरोधात बंड करत सरळ भाजपला सत्तेत बसवले होते त्यामुळे एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात. 3) अजित पवार यांना अचानक मुख्यमंत्री करून भाजप धक्कातंत्र देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे 4)एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पद दिले जाऊ शकते. 5)एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवत पुन्हा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असू शकतात. 6) काही महिन्यानंतर महापालिका निवडणुका होण्याची शक्यता असल्यामुळे एकनाथ शिंदे यांना इतक्यात मुख्यमंत्री पदापासून लांब करण्याची घाई भाजप करणार नाही. मात्र धक्कातंत्र देण्यात पटाईत असलेली भाजप पुन्हा एकदा महाराष्ट्रात धक्का देणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल

![]()












