पोलीस यंत्रणा “हाय अलर्ट” वर, शहर ‘नो ड्रोन फ्लाय झोन’

नाशिक : विधानसभा निवडणुकांचे वातावरण तापत असून यानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (शुक्रवार दि 8) उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून नाशिक शहरातील तपोवनातील साधुग्राममध्ये त्यांची सभा दुपारी दोन वाजेच्या सुमारास होणार आहे. यानिमित्ताने शहर, ग्रामीण पोलीस यंत्रणेला हाय अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. सभेसाठी नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) कमांडो तसेच विशेष सुरक्षा गार्ड (एसपीजी) चे पथकदेखील नाशिक शहरात दाखल झाले आहे. सभास्थळी 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. त्याचबरोबर विशेष सुरक्षा दलाचे सशस्त्र जवानदेखील सज्ज असणार आहेत. बॉम्ब शोधक-नाशक पथके देखील दाखल झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या सभेनिमित्त विविध महत्वाच्या व अतिमहत्वाच्या व्यक्तींचा दौरा असणार आहे या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार संपुर्ण शहर व परिसरात नो ड्रोन फ्लाय झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारचे ड्रोन, पॅराग्लाइट्स, पॅरामोटर्स, हॉट एअर बलून्स, मायक्रोलाईट एअरक्राफ्ट आधी प्रकारच्या हवाई साधनांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे शहरातील ड्रोन चालक-मालक यांनी दोन दिवस अधिसूचनेत नमूद केलेल्या कालावधीप्रमाणे ड्रोन्स कुठलेही हवाई साधनांचा वापर करू नये असे स्पष्ट करण्यात आले आहे या आदेशाचा भंग करणाऱ्या विरुद्ध संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक यांनी भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार व भारतीय एअरक्राफ्ट कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्याचबरोबर पंतप्रधान दौऱ्यासाठी पंचवटी भागात जाणाऱ्या सात वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.

![]()












