पुत्र योगेश घोलप यांना उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटाचा दिला राजीनामा

नाशिक : विधानसभेच्या निवडणुकीत देवळाली मतदारसंघ महाविकास आघाडीत कोणाला सुटणार म्हणजेच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला की ठाकरेंच्या शिवसेनेला यावर बरीच रस्सीखेच झाल्यानंतर काल देवळाली मतदारसंघ अखेर ठाकरे गटाच्या शिवसेनेला सुटला आणि माजी आमदार योगेश घोलप यांना उमेदवारी जाहीर झाली. आपल्या मुलाला उमेदवारी जाहीर होताच लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर शिंदे गटाच्या शिवसेनेत गेलेले माजी मंत्री बबनराव घोलप यांनी आज पुन्हा एकदा हातात शिवबंधन बांधत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिर्डी लोकसभेच्या उमेदवारीवरून नाराज असलेले ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करत, घोलप यांनी शिंदे गटाचे काम सुरू केले मात्र त्यांचे पुत्र माजी आमदार योगेश घोलप यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत राहणे पसंत केले काही दिवसांपूर्वी देवळाली विधासभेची जागा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला जाणार असे लक्षात आल्यानंतर बबनराव घोलप यांनी शरद पवारांची देखील भेट घेतली होती. मात्र योगेश घोलप यांना ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर घोलप यांनी तडकाफडकी शिंदे गटाचा राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश करताना घोलप यांना चर्मकार महामंडळाचे अध्यक्षपद, देण्यासह समाजाच्या काही मागण्या तसेच मतदारसंघातील विकासकामांचे आश्वासन देण्यात आले होते परंतु यातील एकाही आश्वासनाची पूर्ती न झाल्याने त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी माझ्या पुत्राला उमेदवारी दिली असल्याचे सांगत, पक्षाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे मात्र यामुळे नाशिकच्या शिंदे गटाच्या शिवसेनेत देखील गळती सुरू झाल्याची चर्चा आहे.

![]()












