गुन्हेगाराच्या नातेवाईक व मित्रपरिवाराला काढलेली मिरवणूक चांगलीच भोवली

नाशिक : आधी केलेल्या गुन्ह्यातील जेल मधून सुटका झाल्यानंतर मित्रमंडळी, नातेवाईक व घरातील सदस्यानी “बॉस इज बॅक” म्हणत काढलेली मिरवणूक त्या गुन्हेगारासह नातेवाईकांना चांगलीच भोवली असून पोलिसांनी मिरवणुकीत सहभागी असलेल्या एक -एक सदस्यांना शोधून काढत गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. नाशिक शहरातील पोलीस आयुक्तालय अंतर्गत असलेल्या सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जेलमध्ये असलेला सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर याची काही दिवसांपूर्वी जेलमधून सुटका झाली होती. त्यांनतर घरी पोहचल्यावर नातेवाईक व इतर मित्रमंडळीनी त्याच्या निवासस्थानापासून मिरवणूक काढली आणि त्यांनतर त्या मिरवणुकीचे रिल्स, फोटो सोशल मीडियावर टाकण्यात आले. यामुळे नाशिककरांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या हे पहात पोलिसांनी संपूर्ण नाशिक शहरात धाडसत्र राबवत मिरवणुकीत सहभागी झालेल्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली. या मिरवणुकीतील 1 कार व 3 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून सराईत गुन्हेगार व त्याचे नातेवाईक, मित्र परिवार अशा 30 हुन अधिक इसमांवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 19 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचबरोबर मिरवणुकीत सामील इतर गुन्हेगारांवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे. मुख्य गुन्हेगार व त्याच्या साथीदाराला यापूर्वीच्या दाखल गुन्ह्यांमध्ये पुन्हा अटक करून त्यांची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली मुख्य म्हणजे पोलिसांनी या कारवाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकत एकप्रकारे गुन्हेगार व त्यांच्या समर्थकांना इशाराच देण्याचा प्रयत्न केला आहे. तडीपारास मध्यरात्री पोलिसांनी घेतले ताब्यात नाशिक शहरातून तडीपार असूनही राजरोसपणे शहरात वावरणाऱ्या गोपाल नागोलकर यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत रात्री बारा वाजेच्या सुमारास तिबेटियन मार्केट येथील एका हॉटेलमधून बाहेर पडत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले . याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरकर याच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरोधात तडीपारीची कारवाई केलेली असताना रात्री तो एका हॉटेलमध्ये जेवणासाठी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिथे सापळा रचत त्याला ताब्यात घेतले.

![]()











