गिते समर्थक पैसे वाटत असल्याचा आरोप तर भाजप समर्थकांनी गाडीवर हल्ला केल्याचा आरोप

नाशिक : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराचा जोर वाढू लागला असून महाविकास आघाडी व महायुतीच्या वतीने प्रचारसभा, नेत्यांचे दौरे, मिरवणुका सुरू आहेत. यादरम्यान नाशिकच्या पूर्व मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने-सामने येऊन बाचाबाची झाल्याचा प्रकार घडला.नाशिक पूर्व मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राहुल ढिकले असून त्यांच्या समोर आधी भाजपात असलेले आणि त्यानंतर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवणारे गणेश गिते आहेत. सुरवातीच्या काळात या मतदारसंघात माझ्या नावाचा डमी उमेदवार उभा केल्याचा आरोप गणेश गिते यांनी केला होता. त्यापाठोपाठ आज भाजपची रॅली सुरू असताना शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गणेश गिते यांच्या कार्यकर्त्यांकडून पैशाचे वाटप सुरू होती अशी माहिती समोर येत आहे. यादरम्यान भाजप कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहचले व ढिकले आणि गिते समर्थकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी गणेश गिते यांचे कार्यकर्ते पैशांचे वाटप करत असल्याचा आरोप केला तर गणेश गीतेंच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांनी आमच्या गाड्यांवर हल्ला करत तोडफोड केल्याचा आरोप केला. आता हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहचले आहे. खासदार सुप्रिया सुळे नाशिक पोलीस आयुक्तालयात— शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या आज नाशिक दौऱ्यावर आहेत .त्यांनी या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली असून ठेवलेली सभा रद्द करत त्या पोलीस आयुक्तालयात पोहचल्या असून ही बाब चिंताजनक असून या ठिकाणी घाणेरडे राजकारण सुरू आहे.आमच्या कुटूंबातील माणसांवर असे हल्ले होणार असतील तर आम्ही खपवून घेणार नाही. पोलीस प्रशासन काय करत आहे ? असा सवाल देखील सुळे यांनी केला.


![]()












