निसर्गाचा रौद्र अवतार,नागरिकांमध्ये भीती

नाशिक : सुरगाणा तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असताना, दुसरीकडे अनेक शेतजमिनींमध्ये भेगा पडल्या असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने जमीन आणखी खचण्याची शक्यता वाढली आहे. इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी येथे डोंगराचा मोठा भाग खचून मोठे दगड, गोटे आणि मुरूम वेगाने खाली येत शेती खरवडून निघाली. आदिवासी भागातील शेती पूर्ववत करण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जात आहे.मागील तीन दिवसांपासून सुरगाणा, पेठ आणि दिंडोरी तालुक्यात भूगर्भात हालचाली होत आहेत. सुरगाण्यातील बोरगाव परिसरात सोमवारी रात्री पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. दुसरीकडे इगतपुरी तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील डोंगराचा अंशतः भाग खचला. डोंगरात चरीसारखा भाग तयार होऊन पाण्याचा प्रचंड ओहोळ वाहू लागला. या प्रवाहासोबत मोठे दगड, माती आणि मुरूम वेगाने खाली येऊन वनपट्टेधारक तसेच खासगी जमीनमालकांच्या शेतात पसरले. त्यामुळे शेती पूर्णपणे खरवडून निघाली आहे.प्रत्यक्ष घटनास्थळाची परिस्थिती पाहून अंगावर काटा येत आहे. डोंगर खचल्याने शेतजमिनींना तडे गेल्याने निर्माण झालेला संभाव्य धोका लक्षात घेता भूवैज्ञानिक तज्ज्ञांकडून परिसराची पाहणी केली जाणार आहे. भूकंपाचे धक्के बसलेल्या सुरगाणा परिसरातील घटना आणि इगतपुरीतील डोंगर खचण्याच्या घटनेचा थेट संबंध नसला, तरी दोन्ही ठिकाणी भूगर्भातील हालचालींचा समान धागा समोर येत आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही भाग मुसळधार पावसाच्या पट्ट्यात आहेत.

![]()












