खुनात अल्पवयीनांचा समावेश

नाशिक : शहरातील हत्यासत्र थांबत असून आज पुन्हा पंचवटीतील गोदाकाठी भरदिवसा,भरगर्दीत तरुणाची हत्या करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मुख्य म्हणजे आतापर्यंत झालेल्या खूनसत्रात अल्पवयीन मुलांचा सहभाग आढळून येत असल्याने पोलीसदलासाठी ही चिंता निर्माण करणारी बाब आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाशिक शहराच्या गोदाकाठी दर बुधवारी बाजार भरत असतो याठिकाणी बाहेरील व्यापारी, शेतकरी व खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहक यांची मोठी गर्दी याठिकाणी असते. अश्यातच बुधवारच्या आठवडे बाजारात नंदलाल उर्फ सूरज जगत कुमार दास (19,रा सीता गुंफा पंचवटी) हा परप्रांतीय तरुण आपले वडिल जगतकुमार दास यांच्या सोबत बाजार करण्यासाठी आला होता. या दरम्यान म्हसोबा महाराज पटांगणावर गर्दीत धक्का लागण्याचे कारण देत सात ते आठ जणांच्या टोळक्याने कुरापत काढत सुरजवर चाकूने हल्ला चढविला, पोटात वर्मी घाव लागल्याने सूरज रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला यावेळी सुरजच्या वडिलांनी आरडाओरडा करत नागरिकांना मदतीसाठी बोलावले यावेळी तातडीने त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेदरम्यान सायंकाळी ही घटना घडली असता बाजारात खरेदीसाठी आलेल्या महिला व पुरुषांनी घाबरून पळ काढला तर विक्रेत्यांनी घाईघाईने आवरसावर केली .दहशतीमुळे गोदाकाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नंदलाल उर्फ सूरज याच्यावर हल्ला करणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून पंचवटी पोलिसांनी पथक पाठवत मारेकऱ्यांचा शोध सुरू केला असून रात्री उशिरा एका संशयित गुंडाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. संशयितांनविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

![]()












