तरुणाच्या गळ्याभोवती मांजा अडकल्याने पडले 75 टाके

नाशिक : नायलॉन मांजाने अनेकांना दुखापत झाली असून काहींना तर आपला जीव देखील गमवावा लागला असताना देखील आपल्या मजेसाठी बरेच महाभाग नायलॉन मांजाचा वापर करत आहेत. काही महिन्यांपूर्वी वडाळा गावात याच नायलॉन मांजामुळे एका लहान मुलाला जीव गमवावा लागला असतानाच काल वडाळा रोडवरून तरुण आपल्या बहिणीला भेटण्यासाठी जात असताना नायलॉन मांजा गळ्याभोवती अडकून त्याला गंभीर दुखापत झाली. मिळालेल्या माहितीनुसार वडाळा रोडवरून दुचाकीने प्रसूती झालेल्या बहिणीला भेटण्यासाठी नुकताच विवाह झालेला मुशरन मोहसीन सय्यद (रा. अशोकामार्ग)हा सायंकाळी जात असताना वडाळा नाका येथे अचानकपणे हवेतून वेगाने नायलॉन मांजा त्याच्या गळ्याभोवती अडकला आणि त्याचा गळा चिरला गेला. यादरम्यान सय्यद याने दुचाकीचा वेग नियंत्रणात आणला रक्तबंबाळ अवस्थेत तो रस्त्यावर कोसळला असता नागरिकांनी त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविले त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याच्या गळ्यावर झालेल्या जखमेत सुमारे 75 टाके टाकून डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली आहे. जखम इतकी खोलवर आहे की काही मिनिटे जर उपचारासाठी वेळ झाला असता तर अनर्थ घडला असता. असाच प्रकार सिडकोतील लेखानगर परिसरात घडला असून तरुण आनंद भोई (काझी गढी)याचाही गळा नायलॉन मांजाने चिरला गेला त्याच्या गळ्याभोवती अठरा टक्क्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. या युवकाला देखील वेळेवर उपचार भेटले नसते तर अनर्थ घडण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. त्याचबरोबर कन्नमार पुलावरून दुचाकीवर पती सोबत महिला जात असताना अचानक नायलॉन मांजा हवेतून आला अन महिलेच्या तोंडाला घासून गेल्याने नाक व कानाला गंभीर दुखापत झाली. एकीकडे नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले असून पोलीस देखील कारवाई करत असताना नायलॉन मांजा येतो तरी कसा ? आपल्या घरातील व्यक्ती पतंग उडवत असताना त्याकडे कोणता मांजा आहे याकडे देखील पालकांनी लक्ष ठेवले पाहिजे, आपल्या काही तासांच्या मजेसाठी आपण कुणाचा तरी जीव घेत आहोत, कुणाचे कुटुंब उघड्यावर पाडत आहोत याचे भान प्रत्येक व्यक्तीने ठेवले पाहिजे. आणि नायलॉन मांजाचा हट्ट सोडला पाहिजे शेवटी आपल्या काही तासांच्या खेळापेक्षा माणसाच्या जीवाची किंमत मोठी असते….

![]()












