पीडित महिलांची सोशल मीडियावर ओळख दाखवू नका

नाशिक : अशोक खरात प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिली. मुख्य म्हणजे अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने आज पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. अशोक खरातवर एकूण 12 गुन्हे दाखल असून, महिला अत्याचाराचे 8 आणि आर्थिक फसवणुकीचे 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात 10 गुन्हे आहेत. त्यापैकी 8 गुन्हे लैगिक शोषणाचे तर 2 गुन्हे फसवणुकीचे आहेत. याव्यतिरिक्त शिर्डी आणि रहाता या दोन ठिकाणी प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही गुन्हे फसवणुकीचे आहेत, सदर विशेष तपास पथकामध्ये तपास अधिकारी म्हणून दोन पोलीस उपाधीक्षक आहेत, जे माझ्यासोबत दोघे इथं उपस्थित आहेत. हा तपास करण्यासाठी सहाय्यक तपास अधिकारी म्हणून तीन पोलीस निरीक्षक, तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक, 10 पोलीस उपनिरीक्षक आणि 6 पोलीस अंमलदार असे एकूण 24 लोकांचं आपलं पथक तपासासाठी कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली. अशोक खरातला 17 मार्च रोजी अटक करण्यात आली होती, 18 मार्च ला कोर्टात हजर करण्यात आले होते, त्यानंतर पहिल्या गुन्ह्यात 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तर दुसऱ्या गुन्ह्यात 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून उद्या पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे खरात बदनामीची भीती दाखवत लैंगिक शोषण करायचा चौकशीतून आरोपी खरात पीडीत व्यक्तीच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता. धमकी देत होता. भीती दाखवत होता. खडे, चिंचोके इत्यादी गोष्टीद्वारे पैसा उकळत होता. महिलांना दैवी शक्ती असल्याचं सांगत होता. कुटुंबीयांच्या मृत्यूची भीती दाखवून, त्यांना बदनामीची धमकी देऊन लैंगिक शोषण करत होता. ईशान्यश्वर मंदिराच्या परिसरात अंधारात दैवी शक्ती असल्याचं भासवून अंधश्रद्धा पसरवत असल्याची माहिती सातपुते यांनी दिली. 4650 लिंक काढल्या, 2 गुन्हे, 6 जणांना अटक एकूण 4,650 लिंक एसआयटीच्या सायबर टीमने शोधून काढल्या आहेत. आपली 24 लोकांची टीम असून त्यामध्ये चार लोकांची सायबर टीम आहे, या सायबर टीमचे पूर्णवेळ कर्तव्य हे होतं की प्रत्येक काही मिनिटांनी काही नवीन अपलोड झाले का ते शोधणे आणि त्याला रिपोर्ट करणे. महाराष्ट्र सायबरच्या मदतीने 4650 लिंक्स या डिलीट करून घेतलेले आहेत, त्याच पद्धतीने सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट पुन्हा पुन्हा टाकणाऱ्या एकूण 451 अकाउंटला कायमस्वरूपी काढून टाकण्यात आलेला आहे. तसेच, पीडिताचे आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी आत्तापर्यंत दोन गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. सदरचे गुन्हे हे सातपूर पोलीस स्टेशन नाशिक शहर आणि कोपरगाव पोलीस स्टेशन अहिल्यानगर या ठिकाणी दाखल असून संबंधित घटकच त्याचा तपास करत आहेत आणि त्यामध्ये आजपर्यंत एकूण सहा आरोपींना अटक देखील करण्यात आलेले आहे. तेजस्वी सातपुते यांचं आवाहन महिला अत्याचाराच्या संदर्भात आठही गुन्ह्यांमध्ये पीडिता आणि त्यांचे कुटुंबिय अतिशय धाडसाने सामोरे आले आहेत. त्यांनी फिर्याद दाखल केली आहे त्यामुळेच आपण आरोपीवर कारवाई करु शकत आहोत. मी सर्वांना आवाहन करु इच्छिते की, या महिलांना लोक काय म्हणतील या भीतीने अन्याय सहन केला आहे. आता कुटुंबाला विश्वासात घेऊन गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख उघड न करणे, सोशल मीडियावर त्यांचे व्हिडीओ न पसरवणे, आपल्या मोबाईल्समध्ये असे व्हिडीओ न बाळगणे हे आपल्या सर्वांचे नैतिक कर्तव्य आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे तसे आदेश आहेत. पीडितेची ओळख गोपनीय राहणे आणि त्यांच्या खासगी बाबींची सार्वजनीक चर्चा न होणं हे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि त्यांचं धैर्य टिकून राहण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांची चौकशी होणार का ? आपल्याकडे फिर्यादी आणि साक्षीदार सांगतात त्या अनुषंगाने तपास होत असतो. तपासा दरम्यान पुरावे समोर येत असतात त्यानुसार पुढील तपास केला जातो. पुराव्याच्या आधारे कोण व्यक्ती सहआरोपी आहे का? ते पाहिलं जातं. त्या अनुषंगाने त्याची चौकशी केली जाते आणि कायदेशीर कारवाई केली जाते. या प्रकरणात इतर कोणी आरोपी आहे का? पुराव्यानिशी माहिती मिळाली तर निश्चित तपास केला जाईल. आमचा तपास अजूनही सुरु आहे. काही प्रश्नांचे उत्तरे राहिली असती तपास पुढे जाईल तशी माहिती दिली जाईल. आरोपी अशोक खरातची पोलीस कोठडी मिळावी यासाठी न्यायालयात विनंती करणार आहोत. अशोक खरातचे आर्थिक व्यवहार आणि संपत्तीबाबत ईडीने माहिती घेतली आहे.खरातच्या मालमत्तेबाबतचा तपास ईडी आणि एसआयटीकडून संयुक्तरित्या केला जाणार असल्याचं तेजस्वी सातपुते यांनी म्हटलं आहे.तसेच या 40 ते 45 दिवसांमध्ये 8 गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणार असल्याचंही सातपुते यांनी सांगितलं आहे.

![]()












