भाजपा व शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये खदखद

नाशिक : लोकसभा निवडणुकांपूर्वी अचानक राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे शरद पवार यांना सोडचिठ्ठी देत आपल्या 40 आमदारांसोबत भाजप महायुतीच्या सत्तेत सहभागी झाले. त्यावेळी भाजपा नेते व कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता, आता शिंदे गट, अजित पवार गट यामुळे भाजपाची ताकद वाढली असे महायुतीचे नेते म्हणत होते. लोकसभेच्या निवडणुका संपल्या, निकाल लागले आणि महायुतीला महाराष्ट्रात सपाटून मार खावा लागला. मात्र यशाचे मानकरी सर्वच असतात अपयशाचे धनी कोणीही होण्यास तयार होत नाही. याप्रमाणेच आता महायुतीला आलेल्या अपयशाचे खापर अजित पवार गटावर फोडण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या “द ऑर्गनायझर” मध्ये या पराभवाला अजित पवार यांच्याशी असलेली युती कारणीभूत असल्याच्या कानपिचक्या देण्यात आल्या . त्यानंतर भाजपा आणि शिंदे गटाच्या नेत्यांमधून देखील अजित पवार गटाबाबत नाराजी पुढे येऊ लागली असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अजित पवार गटाचे आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये शिंदे गट आणि भाजपा उमेदवार पिछाडीवर का ? असा सवालच या नेत्यांनी उपस्थित केला . जर अजित पवार गटाची मतेच आपल्याला मिळणार नसतील तर तर महायुती मध्ये या तिसऱ्या पक्षाची आपल्याला गरज काय ,अशी चर्चाच दबक्या आवाजात सुरू असल्याची माहिती मिळत आहे . दिंडोरी, नाशिक, सोलापूर, माढा, शिरूर, मावळ या मतदारसंघांमध्ये अजित पवार गटाच्या आमदारांचा फटका भाजपा प्रमाणेच शिंदे गटाला बसल्याची देखील जोरदार चर्चा आहे. दिंडोरी लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला तर भाजपच्या केंद्रीय मंत्री असलेल्या डॉ भारती पवार या पराभूत झाल्या त्यांच्या मतदारसंघात सहापैकी अजित पवार गटाचे चार आमदार आहेत या सगळ्या मतदारसंघात भारती पवार पिछाडीवर आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघात चार आमदार असतानादेखील शिंदे गटातून अजित पवार गटात गेलेले आढळराव पाटील पिछाडीवर राहिले, हीच गोष्ट सोलापूर, माढा मतदार संघात देखील लागू पडते मग जर अजित पवार गटाची मते भाजपा व शिंदे गटाकडे वळत नसतील तर अजित पवार गटाची महायुतीत गरज काय ? असा सूर आता महायुतीत उमटू लागल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात तिसरा भिडू महायुतीत दिसतो का हे पाहणे महत्वाचे ठरेल.


![]()











