छगन भुजबळ, हेमंत गोडसे की अन्य नवीन चेहऱ्याला मिळणार संधी ?

नासिक लोकसभा मतदारसंघ सध्याच्या घडीला हॉटस्पॉट बनला असून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला असून उद्या उमेदवाराची घोषणा होणार आहे. मात्र त्याआधी नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी मित्र पक्षांमध्येच मोठ्या प्रमाणात रणसंग्राम बघावयास मिळाला. नासिक लोकसभा मतदार संघ शिंदे गटासाठी सुरुवातीला सोपा वाटला होता. या ठिकाणी खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार आणि त्यांची वाट सुखद होणार असे वाटत होते. त्यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघ दिवसेंदिवस महायुतीसाठी व उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरू लागला. आणि त्याची सुरुवात भाजपाकडून सुरू झाली भाजपाने हेमंत गोडसेंच्या नावाला जोरदार विरोध केला नुसता विरोधच केला नाही तर नाशिकच्या भाजपा पदाधिकाऱ्यांनी मुंबई गाठत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भेटी दरम्यान नाशिक मतदार संघात भाजपाचे तीन आमदार असल्याने व ही रामभूमी असल्याने या ठिकाणी भाजपालाच उमेदवारी मिळावी असा आग्रह धरण्यात आला. त्याचबरोबर हेमंत गोडसे यांच्या विषयी फडणवीस यांच्याकडे नाराजी नाराजी व्यक्त करण्यात आली. गोडसे कार्यक्रमांच्या वेळी भाजपा नेत्यांचे फोटो बॅनरवर टाकत नसल्याची तक्रार देखील करण्यात आली. यावेळी आ. देवयानी फरांदे आ. सीमा हिरे आ. राहुल ढिकले आ. डॉ राहुल आहेर, दिनकर पाटील आदी उपस्थित होते. त्यानंतर नाशिक शहरात शिंदे गटाच्या शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात मुख्यमंत्री पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सरळ सरळ हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केली. आणि या ठिकाणीच वादाची ठिणगी पडली. यावर मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी उघड नाराजी व्यक्त केली. आणि यानंतर खऱ्या अर्थाने ही जागा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला सुटणार व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढणार अशी चर्चा जोर धरू लागली. या चर्चेला छगन भुजबळ यांनी तिजोरा देत माझी चर्चा दिल्लीतील नेत्यांमध्ये असल्याचे सांगितल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्याचबरोबर दिल्लीतील नेत्यांच्या आग्रहामुळे मी महायुतीचा उमेदवार असू शकतो असे भाष्य भुजबळ यांनी केल्यामुळे आणखीन संभ्रम वाढला. यादरम्यान मनसे भाजपा युतीच्या चर्चा जोर धरू लागल्याने नाशिकची जागा मनसेला सुटू शकते व स्वामी शांतिगिरी महाराज हे उमेदवार असू शकतात अशी चर्चा सुरू झाल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघ नेमका कोणत्या पक्षाला सुटणार व उमेदवार कोण असणार याबाबत संभ्रम आणखी वाढला. तिकडे खासदार हेमंत गोडसे यांनी ठाणे गाठत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर शक्तिप्रदर्शन केले त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोनदा भेट घेण्याचा प्रयत्न हेमंत गोडसे यांनी केल्याचे समजते. या दरम्यान रंगपंचमीच्या दिवशी हेमंत गोडसे यांनी सरळ सरळ प्रचाराला सुरुवात केल्याने खासदार हेमंत गोडसे हे महायुतीचे उमेदवार आहेत का? अथवा मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना तसा शब्द दिला ? या चर्चेला उधाण आले महायुतीतील सर्वच पक्षांची डोकेदुखी मोठ्या प्रमाणात वाढली. यावेळी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांनी आपण प्रबळ दावेदार असल्याचे सांगितले आपल्या मनात नसताना देखील आपल्या उमेदवारीची चर्चा दिल्लीत झाली आणि त्यांच्या आग्रहामुळे महायुतीकडून उमेदवार असू शकतो. असे भुजबळ बोलल्याने नेमके उमेदवार तरी कोण भुजबळ की गोडसे ? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. मात्र भुजबळांच्या नावाला देखील विरोध होऊ लागल्याने पुन्हा एकदा नवनवीन नावे चर्चेत येऊ लागली यामध्ये भाजपाचे आमदार राहुल ढिकले, शिंदे गटाचे अजय बोरस्ते आणि आता पुन्हा ठाकरे गटाचे नाराज असलेले विजय करंजकर यांचे नाव महायुती कडून उमेदवारीसाठी चर्चेत आल्याने दिवसेंदिवस संभ्रम वाढत चालला आहे. मित्र पक्षातील सर्वच पक्ष नाशिक लोकसभेसाठी एकमेकांवर दबाव टाकत असल्याचे देखील समजते. मिळालेल्या माहितीनुसार नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला असून उद्या उमेदवारीची घोषणा होणार आहे. यामध्ये नेमका कोणाचा पत्ता कट होतो व कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते याकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे यामध्ये छगन भुजबळ हेमंत गोडसे किंवा अजून कोणी नवीन चेहरा महायुतीचा उमेदवार असणार आहे हे उद्याच कळेल…..

![]()











