भाजप शहराध्यक्षांनाघातला घेराव

नाशिक : महापालिका निवडणुकीत सत्तेत वाटेकरी व मित्र पक्ष असलेल्या शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना चर्चेत गुंतवत भाजपने स्वबळाचा नारा दिला.त्यानंतर मात्र एबी फॉर्म वाटपाच्या दिवशी निष्ठावंतांच्या संयमाचा बांध तुटला. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने उमेदवारांची यादी घोषित न करता सरळ एबी फॉर्म वाटपास सुरुवात केली. यामुळे इच्छुक उमेदवार सैरभैर झालेत. आणि त्यानंतर गाड्यांचा पाठलाग,फार्महाउस मध्ये झालेला राडा ,नेत्यांमधील वाद संपूर्ण महाराष्ट्राने बघितले. त्याचा दुसरा अंक अजूनही सुरू असून शहरातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष सुनील केदार यांना गाजरं दाखवून आपला निषेध नोंदवत घोषणाबाजी केली. नाशिक रोड परिसरात आयोजित एका कार्यक्रमासाठी भाजप शहराध्यक्ष सुनील केदार उपस्थित होते. यावेळी तिकीट वाटपात डावलले गेलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी केदार यांना घेराव घालत जाब विचारला. पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून नवीन किंवा आयात केलेल्या लोकांना महत्त्व दिले जात आहे.असा आरोप निष्ठावान कार्यकर्त्यांनी केला. कार्यकर्त्यांनी यावेळी आक्रमक घोषणाबाजी केली. “पक्षासाठी आम्ही रक्त आटवायचे आणि संधीची वेळ आली की आम्हाला फक्त गाजर दाखवायचे?” असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांनी विचारला. हातात खरी गाजरं घेऊन कार्यकर्त्यांनी शहराध्यक्षांचा निषेध केला. यादरम्यान नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढताना शहराध्यक्ष केदार दिसले यादरम्यान संतप्त झालेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी जाब विचारत संतापाला वाट मोकळी करून दिली.

![]()















