आमदारांच्या मुलांचा पत्ता कट

नाशिक : नगरपालिका निवडणुकीत एकाच कुटुंबातील अनेक जणांना संधी देणाऱ्या भाजपने महापालिका निवडणूक साठी आपली रणनीती बदलली आहे. पक्षात घराणे शाहीला थारा न देण्यासाठी आणि पक्षासाठी राबणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळावा या उद्देशाने विद्यमान आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या मुले, पत्नी, मुली व नातेवाईकांना महापालिका निवडणुकीत उमेदवारी न देण्याचे धोरण भाजपने स्वीकारले आहे. याचाच फटका आमदार देवयानी फरांदे यांचा मुलगा अजिंक्य फरांदे आणि आमदार सीमा हिरे यांची कन्या रश्मी हिरे बेंडाळे यांना बसला आहे . आमदार फरांदे यांचे पुत्र अजिंक्य यांनी प्रभाग क्रमांक सात मधून ओबीसी गटातून अर्ज दाखल केला होता. तर आमदार हिरे यांच्या कन्या रश्मी यांनी सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक आठ मधून ओबीसी महिला या प्रवर्गातून अर्ज दाखल केला होता. या दोघांनी सुद्धा गेल्या दोन ते तीन वर्षापासून जनसंपर्क वाढवत निवडणुकीची तयारी सुरू केली होती. परंतु सोमवारी अर्ज दाखल केल्यानंतर ऐनवेळी हा निर्णय कळविण्यात आल्याने या दोघांची उमेदवारी अडचणीत आली आहे. अर्थात पक्षाने अगोदरच याबाबत सूचना केली असती तर अधिक सोयीचे झाले असते अशी प्रतिक्रिया आमदारांनी व्यक्त केली आहे. अखेर माघार घेतली पक्षाने दिलेले आदेश मान्य आहेत रश्मी बेंडाळे हिरे आणि अजिंक्य सुवास फरांदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी ते मागे घेतील असे आमदार सीमा हिरे आणि आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितले .

![]()











