सिडको परिसरात शस्त्रधारी टवाळखोरांचा धुडगूस, वाहनांची नासधूस, दगडफेक

नाशिक : शहरात पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात जोरदार मोहीम सुरू केली असतानाच सिडको परिसरातील टवाळखोरांनी सरळ पोलिसांनाच आव्हान दिले असून हातात घातक शस्त्रे घेत नागरिकांना धमकावत वाहनांची नासधूस करण्यात आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. काल सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास नागरिक व महिला वर्ग आपआपल्या कामात व्यस्त होते तर शालेय विद्यार्थी क्लासहुन घरी जात होते त्याचबरोबर परिसरातील भाजी बाजारात देखील गर्दी असताना अचानकपणे पाच ते सहा जणांचे टोळके दुचाकीवरून बसून हातात धारदार शस्त्रे घेत सिडकोतील पवननगर स्टेडियम येथून रस्त्यात जे दिसेल त्यांना धमकावत शस्त्रे दाखवून भीती पसरविण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या घरासमोर असलेल्या दुचाकींचे नुकसान केले. तर काही घरांवर अचानकपणे दगडफेक केली. घरांच्या खिडक्या काचा फोडल्या या टोळक्याने सुमारे अर्धा तास वेगवेगळ्या भागात धुमाकूळ घातला. यादरम्यान एका महिलेचा अंगावर सायकल उचलून फेकल्याने हातांना दुखापत झाली अखेर परिसरातील रहिवाश्यांनी टोळक्यातील एका संशयित गुंडाला पकडून चोप दिला. याठिकाणी मोठयाप्रमाणात गर्दी जमा झाल्यानंतर अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नागरिकांनी त्या संशयिताला पोलिसांच्या हवाली केले. या टवाळखोरांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

![]()















