अवघ्या काही तासात संशयित गजाआड

नाशिक : पंचवटी परिसरातील गोदाकाठी भरणाऱ्या आठवडा बाजारात, भरदिवसा तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा पंचवटी परिसरातील फुलेनगर भागात भावावर जादूटोणा केल्याच्या संशयावरून संजय सासे या व्यक्तीस विटांनी ठेचून ठार मारल्याची धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार पंचवटी परिसरातील फुलेनगर भागातील मनपाच्या शाळेच्या पाठीमागे संजय तुळशीराम सासे (40 रा. फुलेनगर) आणि संशयित विशाल क्षीरसागर, तसेच धीरज सकट यांच्यामध्ये शाब्दिक वाद सुरू झाले त्यानंतर विशाल क्षीरसागर याने संजय सासे यांना धक्काबुक्की सुरू केली यादरम्यान सकट आणि क्षीरसागर यांनी सासे यांच्यावर हल्ला करत बांधकामासाठी जवळच आणून ठेवलेल्या विटा उचलून सासे याचे डोके ठेचण्यास सुरवात केली. डोक्यावर जबर दुखापत झाल्याने सासे रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळले.

यादरम्यान क्षीरसागर आणि मित्राने घटनास्थळावरून पळ काढला. यामध्ये मोठ्याप्रमाणात रक्तस्राव झाल्याने सासे यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. विशाल क्षीरसागर याचा भाऊ प्रमोद क्षीरसागर याचा आठ महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यास सासे याने काहीतरी जडीबुटी खाऊ घातल्याचा व जादूटोणा करत अघोरी कृत्य केल्याचा संशय विशाल याला होता.घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, व गुन्हे शोध पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली, घटनेनंतर काही तासात पोलिसांनी दोघा संशयितांना जेरबंद करण्यात यश मिळविले. शहरातील वाढती गुन्हेगारी नागरिक मात्र दहशतीखाली शहरात होणाऱ्या वाढत्या गुन्हेगारीमुळे सामान्य नागरिक दहशतीत जगत आहेत. दर महिन्याला होणारे खून,अत्याचाराच्या घटना, तरुणांमध्ये वाढत चाललेली हिंसक प्रवृत्ती आणि टोळीगिरीच्या प्रकारांनी परिस्थिती आणखी गंभीर होत चालली असून अशा घटनांमुळे पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.

![]()












