चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

नाशिक : शहरात चक्क स्वतःच्या लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो व्हॉट्सऍपच्या स्टेटसला ठेवल्याने संतापलेल्या मैत्रिणीने मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सातपूर परिसरातील कामगारनगर येथे राहणारे सूरज उर्फ पप्पू काशिनाथ घोरपडे (वय 39) यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो स्टेटसला ठेवले होते. यादरम्यान सुरज यांची मैत्रीण संशयित इंदू विजय साळवे हिने सुरजला फोन करून त्रास देण्यास सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून सूरज हे विल्लोळी येथील इंदूच्या घरी विचारणा करण्यासाठी गेला असता इंदूचा भाऊ संशयित शशिकांत गांगुर्डे, नवीन सोनकांबळे, अजय कांबळे यांनी सुरजला लाकडी दांड्याने मारहाण केली त्याचबरोबर विल्लोळी शिवारातील एका मंदिराच्या पाठीमागे असलेल्या निर्जन भागातील मोकळ्या जागेत घेऊन जात सुरजच्या डोक्यावर पोटावर हत्याराने वार करून जिवे ठार मारल्याचे त्यांचे भाऊ किरण घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरवात केली असता गुन्हे शाखा युनिट-1 ला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्रंबकेश्वरजवळील काचूली गाव गाठले आणि यातील संशयित शशिकांत गांगुर्डे यास गजाआड केले तर नाशिक तालुका पोलिसांनी तपासचक्रे फिरवत इंदू साळवेलाही ताब्यात घेतले. संतापाच्या भरात इंदू हिने भावाच्या मदतीने मित्राचा काटा काढला. गेल्या चार वर्षांपासून इंदू ही सुरजच्या संपर्कात आली होती त्यानंतर त्यांच्यात मैत्री वाढत गेली आणि अखेर या मैत्रीनेच मित्राचा घात केला. तालुका पोलिसांनी चौघाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

![]()















