रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत 25 किलोमीटर इतका पोलिसांचा पाठलाग,गांजा तस्करीचा होता डाव

नाशिक : चित्रपटात आपण नेहमी बघतो गुंडांचे वाहन आणि त्याचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या अनेक वाहनांचा ताफा मात्र चित्रपटातील थरार काल मध्यरात्री नाशिक शहरात घडला. यावेळी नाशिकच्या महामार्गावर एक दोन नव्हे तर तब्बल आठ पोलीस वाहनांचा सायरन घुमत होता अन दिव्यांचा झगमग होताना दिसला. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार आडगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाकडून नववा मैल हद्दीमध्ये रात्री अडीच ते तीनच्या सुमारास पोलीस हवालदार भाऊराव गांगुर्डे, बाळकृष्ण पवार “स्टॉप अँन्ड सर्च” या उपक्रमांतर्गत वाहन तपासणी करत असतानाच धुळ्यातून नाशिकमार्गे पनवेलच्या दिशेने एक लाल रंगाची कार (एमएच 02 जेपी 0123) सुसाट येताना दिसली. पोलिसांनी कार चालकाला थांबण्याचा इशारा केला असता त्याने वेगाने कार पळवली. भाऊराव गांगुर्डे यांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल दिला. हा कॉल कक्षातील अंमलदार सुगंधा नवले यांनी घेत लागलीच अन्य वाहने मदतीसाठी रवाना केली. यामध्ये रात्रगस्त कर्तव्यावरील सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांची जीप, पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या पथकाचे पीटर मोबाईल जीप, आडगाव गुन्हे शोध पथकाची मोबाईल जीप, पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांचे पथक, तपासणी कर्तव्यावरील विशेष शाखेचे युवराज पतकी यांचे पथक, मुंबई नाका गुन्हे शोध पथक, भद्रकाली पीटर मोबाईल पथक, पंचवटी गुन्हे शोध पथक, अशी आठ पोलीस वाहने अगदी सिनेस्टाईल पध्दतीने त्या लाल रंगाच्या वाहनाचा पाठलाग करत होते.
मुंबई-आग्रा महामार्गावरील नववा मैल पासून कार सुसाट वेगाने द्वारकाकडे गेली. द्वारका वरून न्यू-टर्न घेत पुन्हा माघारी अमृतधाम पुन्हा अमृतधाम येथून यु-टर्न घेत के के वाघ कॉलेज आणि पुन्हा चक्रधर स्वामी मंदिर असा या कारचा पोलिसांनी मध्यरात्री 2 ते 3 वाजेपर्यंत 25 किलोमीटर इतका पाठलाग केला. अखेर महामार्गाजवळील आडगाव उड्डाणपूलाजवळ रस्त्याचे काम सुरू असल्याने कारचालक अडकला अन पोलिसांच्या वाहनांनी त्यास घेरले. मुख्य म्हणजे या कार चालकाने पोलिसांच्या चार वाहनांना धडक देत पोलीस कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनात तीन वेगवेगळे पॅकिंग केलेले पार्सल आढळले त्यामध्ये प्रत्येक पार्सलमध्ये 9 किलो 880 ग्रॅम,7 किलो 390 ग्रॅम व 10 किलो 664 ग्रॅम असा एकूण साडेपाच लाख रुपये किमतीचा 28 किलोग्राम गांजा मिळून आला हा गांजा धुळ्यातून पनवेल येथे विक्रीसाठी चालला होता पोलिसांनी पाच जणांच्या टोळक्यावर अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कामगिरीत सहभागी असलेल्या पथकांना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व रोख रकमेचे बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.

![]()












