मुलबाळ होत नसल्याने एमबीए झालेल्या महिलेने बाळ पळविले

नाशिक : जिल्हा रुग्णालयातून शनिवारी पाच दिवसांचे बाळ चोरीला गेल्यानंतर जिल्हात खळबळ उडाली होती मात्र गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या पथकाने या प्रकरणाचा अवघ्या बारा तासात छडा लावत बाळ मातेच्या स्वाधीन केले. मिळालेल्या माहितीनुसार लग्नानंतर मुलबाळ होत नसल्याने धुळे येथे राहणाऱ्या सपना मराठे (33) या महिलेने नाशिकचे जिल्हा रुग्णालय गाठले मुख्य म्हणजे नाशिकचे दिंडोरी हे माहेर असलेल्या सपना मराठेला नाशिक शहराची माहिती होती. “एमबीए” झालेल्या सपना जिल्हा रुग्णालयात तीन दिवस वावरत होती. यादरम्यान नुकतीच बाळंतीण झालेल्या सुमन खान बरोबर जवळीक निर्माण केली. माझे नातेवाईक या ठिकाणी ऍडमिट असल्याचे तिने सांगितले. आणि मदत म्हणून बाळाचा सांभाळ करत असल्याचे दाखवत संधी मिळताच बाळाला घेऊन पलायन केले. यादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता एक महिला बाळाला घेऊन जाताना दिसत होती. मात्र पाठमोरी व चेहऱ्यावर ओढणी घेतली असल्याने चेहरा दिसत नव्हता. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आवाहन उभे होते. मात्र पोलीस पथकाने हार न मानता जिल्हा रुग्णालयातील व रुग्णालयाबाहेरील रस्त्यावरील दुकाने, बँकांचे ,एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरवात केली असता पुढे काही अंतरावर रिक्षा थांब्यालगत असलेल्या हॉटेलच्या कॅमेरात संशयित महिला रिक्षामध्ये बसून जाताना दिसली. पोलिसांनी रिक्षा चालकाचा शोध घेऊन व्हिडीओ दाखवत खात्री केली असता त्या महिलेला आपण निमाणी बसस्थानकात सोडल्याची माहिती दिली यादरम्यान पोलीस पथक शोध घेत असतानाच वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना व्हायरल व्हिडीओ बघून एका नागरिकाने संपर्क साधत त्या महिलेला बघितले असून ती दिंडोरीत गेल्याचे सांगितले.

पोलीस पथकाने दिंडोरी गाठत सपना मराठे हिला ताब्यात घेतले.मात्र सपना हिचे कुटूंब देखील बाळाला बघून संभ्रमात होते. तर इकडे बाळ चोरीला गेल्याने आईची प्रकृती खालावली होती. मात्र सकाळी बाळाला कुशीत घेतले त्यावेळी आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात बाळाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करत त्या महिलेला अटक करण्यात आली. पोलीस पथकाने अवघ्या बारा तासात या घटनेचा छडा लावल्याने त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. ही कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, अनुजा येलवे,पूजा गवारे आदींनी केली.


![]()












