नाशिक महानगरपालिकेचा निर्णय; प्राण्यांवर वेळेत उपचार

नाशिक: शहरातील नागरिकांसाठी आरोग्य-वैद्यकीय सेवेची कर्तव्यपूर्ती करणाऱ्या नाशिक महापालिकेने आता प्राणिमात्रांसाठीही मोफत रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून देत भूतदया दाखविली आहे.
शहरातील मोकाट, भटक्या जनावरांसाठी महापालिकेच्या पशुसंर्वधन विभागातर्फे ही मोफत रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याकरिता ठेकेदार नियुक्त केला जाणार असून, या सेवेसाठी १३ लाख २२ हजार रुपये खर्चाच्या प्रस्तावालाही महासभेने मान्यता दिली. त्यामुळे आता निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. या रुग्णवाहिकेकरिता महापालिकेतर्फे लवकरच ‘टोल फ्री’ क्रमांकदेखील उपलब्ध करून दिला जाणार आहे. शहरात पाळीव प्राण्यांप्रमाणेच भटके श्वान, मांजर, तसेच अन्य मोकाट जनावरांची संख्या अधिक आहे. अनेकदा रस्त्यावरील अपघात वा अन्य काही कारणांमुळे या भटक्या प्राण्यांना इजा होते. अशावेळी त्यांना अनेकदा वेळेवर उपचार मिळत नाहीत. काही आजाराने ग्रस्त असलेल्या प्राण्यांमुळे इतर प्राण्यांनाही संसर्ग होण्याची शक्यता असते. अशावेळी या प्राण्यांवर वेळेवर आणि आवश्यक ठिकाणी उपचार होणे गरजेचे असतात. शहरातील काही प्राणिमित्र अशा मोकाट प्राण्यांची निश्चितपणे काळजी घेत आहेत. परंतु, त्यांनाही अनेकवेळा मर्यादा येतात. अपघातग्रस्त वा आजारी असलेल्या प्राण्यांची वाहतूक करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. त्यावर मात करण्यासाठी महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाने प्राण्यांसाठी रुग्णवाहिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
![]()














