
मालेगाव: शहरातील मालेगाव-नामपूर रस्त्यावरील साई सेलिब्रेशन लॉन्सच्या कार्यालयात मोहित अहिरे हा १३ वर्षीय मुलगा मोबाइलवर गेम खेळत बसला होता. यादरम्यान कार्यालयाच्या उघड्या दरवाजातून बिबट्या आत शिरला. बिबट्याला पाहताच क्षणाचाही विलंब न लावता, कुठलाही आरडाओरडा, गोंधळ-गडबड न करता हा मुलगा हळूच उठून बाहेर गेला आणि त्याने बाहेरून कडी लावून घेतली. वडिलांना याविषयी माहिती दिल्यानंतर त्यांनी वन विभागाला कळवले. नाशिक वन विभागाने या बिबट्याची सुटका केली. मोहितने दाखवलेल्या प्रसंगावधानाचे तसेच त्याच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शहरातील मालेगाव-नामपूर रस्त्यावर साई सेलिब्रेशन लॉन्स आहे. त्याला लागूनच कार्यालय व इतर गाळे आहेत. सकाळची वेळ असल्याने सर्व गाळे बंद होते. फक्त कार्यालयच उघडे होते. या कार्यालयातील रखवालदार विजय अहिरे यांचा मुलगा मोहित हा कार्यालयात मोबाइलवर गेम खेळत होता. यावेळी अचानक एक बिबट्या सरळ ऑफिसमध्ये शिरला. भिंतीच्या कडेला बसलेला मोहित क्षणाचाही विचार न करता हळूच बाहेर गेला आणि बाहेरून कडी लावून घेतली. त्यानंतर धावत जाऊन त्याने वडिलांना कार्यालयात बिबट्या शिरल्याची माहिती दिली.
![]()














