नाशिकच्या सभेत उद्धव ठाकरे यांची महायुतीवर चौफेर टीका

नाशिक: महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या आयोजित प्रचारसभेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यासह महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला .उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.मोदीजी बाळासाहेब तुमच्या वर्गातले मित्र नव्हते. बाळासाहेब हिंदूहृदयसम्राट आहेत. तुम्ही त्यांना हिंदूहृदयसम्राट बोलायला शिका. आठवण द्यायची झालं तर शिवाजी पार्कला महाविकास आघाडीची सभा झाली. तेव्हा माझ्या समोर राहुल गांधींनी आपल्या शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला अभिवादन केलं आहे. जसं बाबासाहेबांच्या प्रेमाचं थोतांड सांगत आहात, तसंच जर तुमचं प्रेम हिंदूहृदयसम्राटांवर खरोखर असेल, तर तुमच्या अमितशेठला विचारा बाळासाहेबांच्या खोलीत त्यांनी दिलेला शब्द का मोडला ? कठीण काळात ज्या शिवसेनेनं तुम्हाला पाठिंबा दिला होता, ती शिवसेना का संपवत आहात? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.तुमचं प्रेम, विश्वास याला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. मी पोकळ आश्वासने देणार नाही. मी शक्य असेल तेच बोलतो अन् बोलतो ते करुन दाखवतो. मी म्हणजे देवेंद्र फडणवीस नाही. नाशिक दत्तक घेणार होते. नाशिकला वाऱ्यावर सोडलं अन् गद्दारांना डोक्यावर घेतलं.राम मंदिराचा विषय तुम्ही काढला, कुणीही शंकराचार्य बरोबर नव्हते. पण त्याचवेळी मी नाशिकच्या काळाराम मंदिरात गेलो होतो. हेच ते काळाराम मंदिर ज्या मंदिरात आपल्याच हाडामासाच्या माणसांना प्रवेश बंदी होती. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता. तुम्ही राम मंदिर, काळाराम मंदिराचा विषय काढलाय, म्हणून मी मिंध्यांपासून इथे सर्वांना विचारतो, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने जो अल्पसंख्यांक आयोग स्थापन केला, त्या आयोगामध्ये अल्पसंख्यांक म्हणून जे जे समाज येतात, त्यांचा प्रतिनिधी त्यात घ्यावा लागतो. मग जैन, बौद्ध, ख्रिश्चन, पारशी, मुस्लिम आहेत. तुम्ही यादी काढा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जो धर्म स्वीकारला त्या बोद्ध समाजाचा एक सुद्धा प्रतिनिधी आयोगात का घेतला नाही? याचं उत्तर द्या आणि मग तुम्ही आम्हाला बाबासाहेबांच्या प्रेमाबद्दल शिकवा असेही उद्धव ठाकरे म्हणाले.उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, नाशिक संपूर्ण जिंकून द्या. महाविकास आघाडीचं सरकार आणा. मी ज्यांना ज्यांना शब्द दिले आहेत, ते पाळतो की नाही ते पाहा. असेही आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले


![]()












