जिल्ह्यात तीन ठिकाणी राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमने-सामने

नाशिक : शिंदे गटाची शिवसेना असो अथवा अजित पवार गटाची राष्ट्रवादी व शरद पवारांची राष्ट्रवादी, हे विभाजन झालेले पक्ष पहिल्यांदाच (विभाजन झाल्यानंतर) महाराष्ट्रातील विधासभेच्या निवडणुकांना सामोरे जात आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी राष्ट्रवादी असो अथवा शिवसेना दोन्ही गट आमने-सामने असणार आहेत. नाशिक जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यात महायुतीने 15 जागांवर आपले उमेदवार घोषित केले त्यापैकी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडे सर्वाधिक म्हणजेच 7 जागा आल्या आहेत तर महाविकास आघाडीत शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडे 5 जागा आला आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यात तीन ठिकाणी अजित पवार गट व शरद पवार गट आपापसात भिडणार आहेत. यामध्ये येवला मतदारसंघातुन अजित पवार गटाचे आमदार व मंत्री वजनदार नेते छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून माणिकराव शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली असून या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. तर दुसऱ्या ठिकाणी म्हणजेच दिंडोरी-पेठ मतदारसंघातून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या पत्नी सुनीता चारोस्कर यांना उमेदवारी दिल्याने ही लढत देखील लक्षवेधी ठरणार आहे. तर सिन्नर मतदारसंघातुन अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडुन आमदार माणिकराव कोकाटे यांच्या समोर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेतुन शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीत आलेले उदय सांगळे या तरुण चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे याठिकाणी कोकाटे हे पाचव्यांदा विधानसभेत जातात का ते पहाने महत्वाचे ठरणार आहे. या तीनही मतदारसंघातील सामना हा खरा शरद पवार आणि अजित पवार यांच्यातच रंगणार असून नाशिक जिल्ह्यात दादागिरी चालते की काकागिरी हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे .यावरच जिल्ह्यात शरद पवार गट व अजित पवार गटाचे अस्तित्व कळणार आहे त्यामुळे दोन्ही गटाने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

![]()












