दोन्ही चिन्ह राहणार कायम, त्यांच्या दोन मागण्या मान्य निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

नाशिक : लोकसभेच्या निवडणूकीत तुतारी आणि पिपाणीच्या चिन्हामुळे महाराष्ट्रात अनेक मतदारसंघात गोंधळ उडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला मोठा फटका बसला होता. काही मतदारसंघात तर पिपाणी वाल्या उमेदवारांनी लाखाच्या वर मतदान घेतल्याचे चित्र होते. त्यानंतर सावध झालेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने पिपाणी चिन्ह गोठवण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. यासंदर्भात निवडणूक आयोग काय निर्णय घेणार आहे ? या प्रश्नावर निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली.निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, शरदचंद्र पवार पक्षाने तीन मागण्या केल्या होत्या त्यातील दोन मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. पहिली मागणी राज्य पक्ष म्हणून मान्यता देऊन निधी स्वीकारण्यास मान्यता द्यावी, ही मागणी मान्य करण्यात आली आहे.त्यांनी दुसरी मागणी तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह वोटिंग मशीनवर लहान दिसतं, ते मोठं करावं अशी होती, ही मागणी मान्य करत त्यांच्याकडून आलेल्या आकाराचे चिन्ह ईव्हीएमवर देणार आहोत.शरद पवार गटाची तिसरी मागणी ट्रम्पेट(पिपाणी) हटवावं अशी होती. यावर निवडणूक आयोगानं सांगितलं की, तुतारी वाजवणारा माणूस आणि ट्रम्पेट(पिपाणी) हे वेगळं दिसतं त्यामुळं हटवता येणार नाही.पिपाणी हे चिन्ह त्यांच्या पक्षाच्या चिन्हाप्रमाणे समान नाही, असं त्यांनी शरद पवार गटाला कळवलं आहे.निवडणूक आयोगाने शरद पवार गटाची चिन्ह मोठं करण्याची मागणी मान्य केली आहे. या मागणीवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला लिखित स्वरूपात विचारले होते. त्यांनी दिलेल्या आकारातील पाहिला आकार आम्ही मान्य केला आहे.असे निवडणूक आयोगाच्या वतीने सांगण्यात आले.

![]()











