महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार,आजपासून आचारसंहिता लागू

नाशिक : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्रात आचारसंहिताही लागू झाली आहे.येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित होतील. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबद्दलची मोठी घोषणा केली आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही एकाच टप्प्यात होणार आहे. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी मतदान होणार आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाईल, अशी महत्वाची माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली. विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची तारीख ही 22 ऑक्टोबरपासून सुरु होईल. उमेदवार 29 ऑक्टोबरपर्यंत आपला अर्ज दाखल करु शकणार आहेत. यानंतर 30 ऑक्टोबरला सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल. तर 4 नोव्हेंबर 2024 ला पर्यंत उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. तसेच निवडणूक आयुक्त पुढे म्हणाले की, मतदानाच्या रांगेत काही खुर्च्या असतील, तशी व्यवस्था सगळ्या मतदान केंद्रांवर असेल. तर ८५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या मतदाराला घरातून मतदान करण्याचा अधिकार असेल. त्यासाठी आमचे अधिकारी त्यांच्या घरी जातील. सगळ्या मतदानाची व्हिडिओगग्राफी केली जाईल. मतदानाचा टक्का वाढण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त करण्यात येईल. त्यासाठी वेगवेगळे मोबाईल ॲप उपलब्ध आहेत. ज्यांच्या नावावर क्रिमिनल रेकॉर्ड असेल, त्या उमेदवारांना पेपरमधे ३ वेळा जाहीरात द्यावी लागेल. तर सामान्य नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. २ किलोमीटरच्या आत मतदान केंद्र असेल, असे राजीव कुमार यांनी म्हटले.

![]()











