सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाच्या खुनाने खळबळ

नाशिक : नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरूच असून आज भल्या पहाटे दिंडोरी रोडवरील मेरी वसाहतीत कॉलनी रस्त्यावर सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षकाच्या मुलाचा खून करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील मेरी कंपाउंड परिसरातील गगन प्रवीण कोकाटे (24, राधेश्याम निवास म्हसरूळ ) या युवकाची पहाटेच्या सुमारास अज्ञात संशयीतांनी डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना सकाळी 7 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. सकाळी परिसरात जॉगिंग करणाऱ्या नागरिकांनी रक्ताच्या थारोळ्यातील मूर्तदेह पाहून या घटनेची माहिती पोलिसांना कळवली. या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड,पोलीस निरीक्षक ज्योती आमने यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना मयत गगन कोकाटे याच्या खिशातून चिठ्ठी मिळाल्याची माहिती मिळते आहे. ही हत्या प्रेमप्रकरणातून किंवा आर्थिक वादातून झाल्याचा संशय पोलिसांना असून त्याचे वडील प्रवीण कोकाटे यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .फरार हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट -1 मध्ये कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शहाजी कोकाटे हे काही दिवसांपूर्वीच सेवानिवृत्त झाले होते.

![]()











