
नाशिक: लोकसभा मतदार संघाच्या मैदानात उतरून अपक्ष निवडणूक लढवणारे व महायुतीच्या उमेदवाराला घाम फोडणारे स्वामी शांतीगिरी महाराज हे वाराणसीला रवाना होत असून स्वामी शांतीगिरी महाराज चक्क वाराणसीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचार करणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत स्वामी शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष निवडणूक लढवली आहे. यादरम्यान त्यांच्या माघारीसाठी भाजपाच्या नेत्यांनी बरेच प्रयत्न केले होते. त्यांना भेटून माघार घ्या असे भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी त्यांना विनंती देखील केली होती . मात्र स्वामी शांतीगिरी महाराज आपल्या निर्णयावर ठाम राहिले. आता नाशिकमधील लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यावर आपल्या नित्याच्या कामांना महाराजांनी सुरवात केली. यादरम्यान वाराणशी येथील जनार्दन स्वामी आश्रमात येत्या 28 मे ते 4 जूनदरम्यान जपानुष्ठान ठेवण्यात आले असून त्यानिमित्ताने शांतीगिरी महाराज वाराणसीला रवाना होत आहेत. मात्र रवाना होण्यापूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आपण प्रचार करणार असल्याचे सांगितले याचे कारण सांगताना महाराज म्हणाले त्यांच्याबरोबर आपले विचार जुळत असल्याने व पंतप्रधान हे आदर्शवत असल्याने आपण त्यांचा प्रचार करणार असल्याचे म्हणाले, मात्र काही निर्णय आपण 4 जून नंतर घेणार असल्याचेही ते म्हणतात. त्यांच्या बरोबर राज्यातील अनेक भाविकदेखील काशी येथे जाऊन प्रचारात सहभागी होणार आहेत. ज्यावेळी लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरू होता यादरम्यान महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि शांतीगिरी महाराज यांची रॅली समोरा-समोर आली. त्यावेळी महाराजांनी पंतप्रधान मोदी यांच्या कटआउटच्या दिशेने हार फेकला होता यादरम्यान एका भाविकांने तो हार मोदी यांच्या कटआउटला घातला होता. त्याचवेळी शांतीगिरी महाराज यांनी भाजपा जवळ जाण्याचे संकेत दिले होते.

![]()











