रस्ता ठरलेला असताना देखील अशोका मार्गाने करतात घुसखोरी

नाशिक : शहरात मोठ्या प्रमाणात कुंभमेळ्या निमित्ताने रस्त्यांची कामे सुरू असल्याने अनेक ठिकाणच्या वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे. पुणे महामार्गावरून शहरात येणाऱ्या व शहरातून पुणे महामार्गाकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बस करिता इंदिरानगर- साईनाथ नगर, वडाळा चौफुली डीजीपी नगर- आंबेडकर नगर सिग्नल असा मार्ग शहर वाहतूक शाखेने निश्चित करून दिलेला आहे. याबाबतची आधीसूचनाही जारी करण्यात आली आहे.हा मार्ग ठरलेला असताना देखील काल मुंबई नाका मार्गे भाभानगर वडाळा रोडने अशोका मार्गावरून पुणे महामार्गाच्या दिशेने शॉर्टकट मार्गाने प्रवास करणाऱ्या नाशिक पुणे एसटी बसचा अपघात झाला मात्र सुदैवाने या अपघातात कोणी जखमी झाले नाही मात्र परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मिळालेल्या माहितीनुसार नाशिक-पुणे एसटी बस (एम. एच 14 बीटी 4426) अशोका मार्गाने कल्पतरु नगर जवळून जात असताना अचानक पणे झाडावर जाऊन आदळली. सुदैवाने या अपघातात कोणी जखमी झाले नाहीत मात्र बस मधील सर्व प्रवासी घाबरले होते. बस चालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्यामुळे संध्याकाळपर्यंत या मार्गावरील एका बाजूने वाहतूक ठप्प झाली होती. मुख्य म्हणजे विजय ममता सिग्नल वरून अशोका मार्ग वडाळा रोड भाभानगर मार्गे शहरांतर्गत प्रवासी वाहतूक करणाऱ्या सिटी लिंक बस करिता निश्चित करण्यात आलेला आहे. अशोका मार्गावरील रस्ता हा वसाहती मधून जात असल्याने या ठिकाणी शाळा, क्लासेस, हॉटेल रुग्णालय व दुतर्फा दुकाने आहेत. या परिसरात मोठ्याप्रमाणात नागरिकांची गर्दी असते. यामुळे या रस्त्यावरून केवळ सिटी लिंक बसेसला मार्गक्रमाची परवानगी देण्यात आलेली असताना एसटी बसच्या चालकांकडून या रस्त्याचा वापर कसा केला जात आहे ? चा प्रश्न सामान्य नागरिक करत असून या ठिकाणी मोठा अपघात झाला असता तर याला जबाबदार कोण त्याचबरोबर बहुसंख्य बसेस अशोका मार्ग वडाळा रोडने घुसखोरी करत असल्याने अशा दुर्घटना वारंवार घडत आहेत अशी चर्चा परिसरात सुरू होती.

![]()












