
नाशिक : नाशिकच्या इंदिरानगर परिसरामध्ये एका तरुणीची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या इंदिरानगर येथील वनसंपदा सोसायटीतील गार्डनमध्ये तरुणीच्या हत्येची घटना घडली आहे. रात्री 10:30 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. मृत तरुणीचे नाव वैष्णवी अनिल आवारे असल्याचं समोर आलं आहे. ही तरुणी वनसंपदा सोसायटीमध्ये पीजीमध्ये राहत होती. एका माथेफिरू तरुणाने तिच्यावर चाकूने सपासप वार करून तिचा खून केला. खून केल्यानंतर घटनास्थळावरून हल्लेखोर फरार झाला. वैष्णवी रस्त्याच्या बाजूला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. स्थानिकांनी तातडीने याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. वैष्णवीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी वर्तवला आहे. इंदिरानगर पोलीस अधिक तपास करत आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून इंदिरानगर परिसरात घरफोडी,भाईगिरीचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले आहे. गुंड हे कायद्याच्या बालेकिल्ल्यालाच आव्हान देत असल्याची चर्चा आहे

![]()












