
नाशिक : महापालिकेत अचानक झालेल्या भाजप-शिवसेना युतीमुळे उपमहापौरपदाची संधी हुकलेल्या मच्छिंद्र सानप यांना स्थायी समिती सभापतिपदाची लॉटरी लागण्याचे चित्र आहे. भाजपतर्फे मच्छिंद्र सानप यांना संधी देण्यात आली असून, सभापतिपदासाठी सोमवारी (दि.२३) त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अपक्ष मुकेश शहाणे यांनीदेखील अर्ज दाखल केला असला तरी, शहाणेंकडून माघार घेतली जाण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. मुख्य म्हणजे उपमहापौर पदासाठी शिंदे गटाच्या शिवसेनेला संधी दिली त्याप्रमाणे स्थायी समिती सभापती पदासाठी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला संधी मिळावी अशी मागणी करत अपक्ष मुकेश शहाणे यांनी अर्ज दाखल केला आहे. स्थायी समिती सभापतिपदासाठी उद्या, बुधवारी (दि.२५) निवडणूक होत आहे. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सकाळी ११ वाजता स्थायी समितीच्या सभागृहात निवडणुकीची विशेष सभा होत आहे.स्थायी समितीवर भाजपचे वर्चस्व असून, समितीतील १६ सदस्यांपैकी ९ सदस्य भाजपचे आहेत. त्यामुळे भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. सोबतच गटाची शिवसेना भाजपसोबत सत्तेत असून, त्यांच्याकडे चार सदस्य आहेत. त्यामुळे भाजपकडे सद्यस्थितीत १६ पैकी १३ सदस्यांचे पाठबळ आहे.त्याचबरोबर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र आता राष्ट्रवादीने वेगळी भूमिका घेतल्याने सभापती पदाच्या बदल्यात ते काय आश्वासन देतात याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.त्यामुळे सभापतिपदी सानप यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. कोण आहेत मच्छिंद्र सानप ? भाजपच्या वतीने स्थायी समिती सभापती पदासाठी मच्छिंद्र सानप यांना उमेदवारी देण्यात आली आहे माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे ते पुत्र आहेत पंचवटीतील प्रभाग क्रमांक तीन मधून ते सलग दुसऱ्यांना निवडून आले आहेत त्यांनी यापूर्वी प्रभाग सभापती पद भूषविले आहे

![]()












