
नाशिक : नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिन सोहळ्यादरम्यान वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याने मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. संपूर्ण देशात 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सकाळपासून विविध ठिकाणी मंत्री, पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी ध्वजारोहन करून प्रजासत्ताक दिन साजरा केला. नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन भाषण करत असताना त्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याचा आरोप करत एका महिला कर्मचाऱ्याने थेट त्यांना जाब विचारला. या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचे नाव माधवी जाधव असून त्या वन विभागात कार्यरत असल्याची माहिती आहे. त्यांनी जाब विचारताच उपस्थित पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.घटनास्थळी झालेल्या वादानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना माधवी जाधव म्हणाल्या की, “मंत्र्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही. ज्यांनी संविधान दिले, लोकशाही घडवली, त्या व्यक्तीचे नाव वगळणे ही फार मोठी चूक आहे. मला सस्पेंड केलं तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही.” त्या पुढे म्हणाल्या, “मला मीडियाशी देणं-घेणं नाही. मला वाळूच्या गाड्या उतरवायला लावल्या, मातीचं काम दिलं तरी मी करेन. पण बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही. त्यांनी आपली चूक स्वीकारावी,” असे देखील त्यांनी म्हटले.माधवी जाधव यांनी पुढे सांगितले की, “बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल, याची मी वाट पाहत होते. पण बाबासाहेबांचं नाव भाषणात आलं नाही. लोकशाही आणि संविधानाला कारणीभूत नसलेल्या लोकांची नावं वारंवार घेण्यात आली. मग संविधानाचा आणि प्रजासत्ताक दिनाचा जो खरा मानकरी आहे, त्याचं नाव भाषणात का नाही?” असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया दरम्यान, या संपूर्ण घटनेनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिले. गिरीश महाजन म्हणाले की, माझ्याकडून अनावधानाने राहिले असेल. माझा तसा कुठला हेतू नव्हता. मी फक्त घोषणा दिल्या. भारत माता की जय, वंदे मातरम्, छत्रपती शिवाजी महाराज की जय, माझ्याकडून अनावधानाने झाले असेल. माझा त्यात मुद्दामून नाव डावलण्याचा काहीही हेतू नाही. मी प्रत्येक वेळेस जेव्हा भाषण देतो, त्यावेळी असे काही होत नाही. मात्र मी दिलगिरी व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

![]()












