शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने बनवले नियम….

नाशिक : राज्यातील आमदार आणि खासदारांशी शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांनी सौजन्याने वागावे या संदर्भात राज्य सरकारने नियमावली तयार केली आहे. त्यानुसार यापुढे अधिकाऱ्यांना आमदार आणि खासदार यांच्याशी सौजन्याने नम्रपणे आणि सन्मानपूर्वक वागावे लागणार आहे.मात्र सामान्य नागरिकांचे काय ? अनेकदा सामान्य नागरिकांना सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत वाईट प्रसंगाना सामोरे जावे लागत असल्याची चर्चा आहे. कोणताही खासदार किंवा आमदार कार्यालयात एखाद्या मंत्र्याला भेटायला आल्यास संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी उठून त्यांना अभिवादन केले पाहिजे. दूरध्वनी किंवा मोबाईलवर संवाद साधताना नेहमी आदरयुक्तभाषा आणि शिष्टाचाराचे पालन केले पाहिजे. लोकप्रतिनिधींशी अधिकाऱ्यांनी आदराने वागावे या नियमांचे पालन न करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर प्रसंगी शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधींच्या पत्रांवर कारवाई करण्याबाबतही कडक नियम बनवण्यात आले आहेत. प्रत्येक कार्यालयात आमदार खासदारांच्या पत्रांसाठी एक स्वतंत्र नोंदवही किंवा डिजिटल नोंदवही ठेवणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांना येणाऱ्या पत्रांवर जास्तीत जास्त दोन महिन्यांच्या आत नियमानुसार त्वरित कारवाई करून अंतिम उत्तर देणे बंधनकारक असेल. हे निर्देश बदली आणि पदोन्नती सारखे विषय वगळता इतर सर्व विषयांवर लागू असतील. जर दोन महिन्यात अंतिम उत्तर देणे शक्य नसेल तर कार्यालय प्रमुखांच्या माहितीनुसार आमदार खासदारांना परिस्थितीबद्दल तात्पुरते उत्तर पाठवावे लागेल. जिल्ह्यातील सरकारी भूमिपूजन उद्घाटन इत्यादी कार्यक्रमांसाठी संबंधित जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी असलेल्या केंद्रीय मंत्री, मंत्री, राज्यमंत्री, पालकमंत्री स्थानिक सर्वपक्षीय आमदार, खासदार, महापौर जिल्हा परिषद अध्यक्ष, नगरपरिषद, नगरपंचायतीचे नगर अध्यक्ष, सरपंच, यांना आमंत्रित करण्यात यावे. त्याचबरोबर त्यांची आसन व्यवस्था ही नावे कार्यक्रमाच्या पत्रिकेत शिष्टाचारानुसार सुनिश्चित करण्यात यावी. आमदार आणि खासदारांनी संसदीय कामकाजाची संबंधित मागितलेली माहिती त्यांना विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावी. संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी या सर्व निर्देशाचे कडक पालन करावे याचे उल्लंघन टाळाटाळ किंवा निष्काळजीपणा दाखवल्यास संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाईकेली जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

![]()














