बिबट्याच्या हल्ल्यात वनविभागाचे कर्मचारी जखमी

नाशिक : आज दुपारच्या वेळेत नागरिक आपल्या दैनंदिन कामकाजात व्यस्त असतांना बिबट्या नाशिक शहरातील संत कबीर नगरात घुसला. बिबट्याला बघताच रस्त्यावरील नागरिकांनी इकडे तिकडे पळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घाबरलेल्या बिबट्याने काही जणांवर हल्ला केला. त्यात दोन जण जखमी झाले. बिबट्या शहरात आल्याची माहिती मिळाल्यावर वनविभागासह पोलीस पथक परिसरात दाखल झाले. संत कबीर नगरातून बाहेर पडल्यानंतर बिबट्या भोसला मैदान आणि त्यानंतर महात्मा नगर परिसरात घुसला एका मातीच्या घरात बिबट्या अडकला. त्याला त्याठिकाणी पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो घराच्या मागील बाजूने पळाला. पळालेला बिबट्या महात्मा नगर येथील वनविहार कॉलनी परिसरातील मोकळ्या मैदानात तसेच दोन- तीन इमारतींच्या पार्किंग मध्ये गेला. बिथरलेला बिबट्या समोर दिसेल त्या नागरिकांवर हल्ले करत होता. या हल्ल्यात सहा जण जखमी झाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी निर्मळ यांनी दिली. यादरम्यान एका बेकरीमध्ये बिबट्या अडकला असता वनविभागाच्या वतीने त्याला बेशुध्द करण्याची तयारी केली. मात्र त्या ठिकाणाहूनही बिबट्या निसटला. तारामंगल या इमारतीत बिबट्या अडकला. वनविभागाच्या वतीने या ठिकाणी जाळ्या लावत त्याला बेशुध्द करण्यासाठी ट्रँक्युलायझेशन गनव्दारे इंजेक्शन देण्याची तयारी करण्यात आली.यादरम्यान मंत्री गिरीश महाजन त्या ठिकाणी पोहचले. त्यांनी वन अधिकारी, कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन परिस्थिती जाणून घेतली. अखेर सहा वाजेच्या सुमारास बिबट्याला पहिल्यांदा गनव्दारे इंजेक्शन देण्यात आले. त्यामुळे चवताळलेल्या बिबट्याने तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्नात वनविभागाच्या संतोष बोडके, प्रवीण गोलाईत यांच्यावर हल्ला केल्याने ते जखमी झाले.बिबट्या बेशुध्द झाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यास विशेष वाहनात बंद केले. आणि अखेर अनेक तासांनपासून सुरु असलेला बिबट्याचा थरार अखेर संपला.


![]()












