झोपण्याच्या जागेवर लघुशंका का केली ? यावरून वाद…

नाशिक : शहरात खुनाचे सत्र सुरूच असून काही दिवसांपूर्वी सातपूर व पाथर्डी फाटा परिसरात झालेल्या तरुणांच्या खुनामुळे नाशिक शहर हादरले असतानाच शहरातील वडाळा नाका उड्डाण पुलाखाली दोन भिकाऱ्यांमध्ये मोठ्याप्रमाणात वाद झाल्यानंतर या वादात एकाने दुसऱ्याचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार महामार्गाजवळ असलेल्या उड्डाणपूलाखाली अनेक भिकारी राहतात. यामध्ये जयेश दिपक रायबहाद्दूर व बंडू लक्ष्मण गांगुर्डे हे दोघेही मोलमजुरी करून अथवा भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत होते.गेल्या अनेक दिवसांपासून ते या उड्डाण पुलाखाली वास्तव्यास होते मात्र काल रात्री दोघांचे कुटूंब स्वयंपाकाची तयारी करत असताना काही अंतरावर गांगुर्डे यांच्या झोपण्याच्या जागेवर जयेश रायबहाद्दूर हा लघुशंका करत असताना बंडू गांगुर्डे त्याला समजावण्यासाठी गेला असता यावेळी दोघांमध्ये वाद झाले या वादात संतापलेल्या जयेश रायबहाद्दूर याने रागाच्या भरात बंडू गांगुर्डे याच्यावर धारदार चाकूने जोरदार हल्ला केला. यादरम्यान स्वयंपाक करणाऱ्या बंडू गांगुर्डेची पत्नी अक्काबाईने आरडाओरडा करत धाव घेतली. यादरम्यान संशयिताने धूम ठोकली.गंभीर जखमी बंडू याच्यावर इतर भिकाऱ्यांच्या मदतीने रात्रभर घरगुती उपचार करण्यात आले.सकाळी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता अतिरिक्त रक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरानी सांगितले.याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र यामुळे वाढणाऱ्या भिकाऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून हे भिकारी दिवसभरअमली पदार्थांच्या नशेत तल्लीन असतात यामुळेच हा खून झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

![]()












