“दादांचा” दुसरा मंत्री देखील अडचणीत

नाशिक : राज्याचे कृषिमंत्री व अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने मोठा धक्का दिला असून आ. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली असून यामुळे त्यांचे मंत्रिपद अडचणीत येण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार 1995 साली कागदपत्रांचा फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात, त्या सदनिका घेतल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की आमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाहीये, अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली होती. त्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळालेल्या होत्या. मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केलेली होती. याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. याबाबत नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. हे प्रकरण 1997 पासून सुरु होतं आणि आज या प्रकरणाचा निकाल लागला असून यामध्ये एकूण चार आरोपींना दाखवण्यात आलेले होते. त्यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूसह इतर दोघांचा समावेश होता. मात्र इतर दोन जणांबाबत कोर्टाने कुठल्याही स्वरूपाच्या शिक्षेची तरतूद केलेली नाही. मात्र माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू या दोघांना दोन वर्षाची शिक्षा आणि 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यामुळे मात्र राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून कोकाटे यांचे मंत्रिपद धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

![]()














