सिडकोत धारदार हत्याराने वार तर बेथेलनगरला टोळीकडून पिस्तुल रोखत राडा

नाशिक : नाशिक शहरातील घडणाऱ्या घटनांमध्ये सराईत गुन्हेगार डोके वर काढत असून काही दिवसांपूर्वी सिडको परिसरात असलेल्या सावतानगर भागात एका रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराने मद्यधुंद अवस्थेत चार ते पाच लोकांवर धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याचा प्रकार घडला होता. तर दुसरीकडे पंचवटी परिसरात एका नामांकित बिल्डरच्या घरावर पहाटेच्या सुमारास गोळीबार व दगडफेक करण्यात आल्याने परिसरात दहशत पसरली होती. ते गोळीबार करणारे गुन्हेगार अजूनही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. तर काल आडगाव शिवारातील बळीराजनगर परिसरात एका सराईत गुन्हेगारासह त्याच्या दहा ते बारा साथीदारांच्या टोळीने मनपा कर्मचाऱ्याला मारहाण व शिवीगाळ करत घरांवर दगडफेक करत धिंगाणा घातल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर व सुमित बगाटे हे त्यांचे आठ ते दहा जणांच्या टोळी सोबत बळीराज नगरात रात्री दहा वाजेच्या सुमारास आले होते यावेळी हे टोळके मनपा कर्मचारी फिर्यादी पंकज चंद्रकांत रकिवे यांचे मित्र सतनाम राजपूत यांच्या घरी त्यांच्या पाळीव कुत्र्याला जेवण देण्यासाठी गेले होते. यावेळी पाटणकर बगाटे व त्याची टोळी रजपूत यांच्या घरावर दगड फेकत असल्याचे दिसले. रकिबे यांनी त्यांना हटकले असता राजपूत यांच्याकडे खूप पैसे आहेत. मला पाच लाख रुपये द्यायला सांग असे म्हणत मारहाण करून गळ्यातील एक सोन्याची चैन खिशातील तेराशे रुपये बळजबरीने हिसकावून घेत सहा ते सात दुचाकीवरून टोळक्याने धूम ठोकली. तर दुसरीकडे बेथेलनगरात मध्य प्राशन करून बाटल्या रस्त्यांवर नागरिकांच्या घरासमोर फोडण्याचा प्रयत्न करत असताना एका रहिवाशाने हटकले असता संशयित हर्षद पाटणकर, सुनील पाटणकर, राहुल पवार, वेदान्त चाळगे यांनी फिर्यादीच्या पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादी महिलेने त्यांना रोखले असता टोळक्याने फिर्यादीचा विनयभंग करत गळ्यातील सोनसाखळी बळजबरीने हिसकवून नेली तसेच पाटणकर यांनी कमरेला लावलेले पिस्तूल काढून ते रोखून धमकावले असे पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी विनयभंग, मारहाण व शस्त्रबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसरीकडे आडगाव पोलीस ठाण्यात देखील दरोड्यासह खंडणीचा गुन्हा संशयित हर्षद पाटणकर व त्याच्या साथीदार सुमित बगाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सराईत पाटणकर, बगाडे व त्याच्या दहा ते बारा साथीदारांनी बळीराज नगरात घातलेला राडा हा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. याफुटेजच्या आधारे आडगाव पोलिसांकडून हर्षद पाटणकर व सुमित बगाटे यांना ताब्यात घेतले असून इतर साथीदाराचा शोध सुरू आहे.

![]()












