काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

नाशिक : शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, सामान्य नागरिक देखील जादा आमिषाला बळी पडत आहेत असा प्रकार नाशिक शहरात घडला असून शेअर मार्केट करता डिमॅट खाते उघडण्यास व जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून सुमारे 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कळवण तालुक्यातील ओतूर रोड शिवाजीनगर तलाठी कॉलनी येथे राहणारे तेजस साहेबराव पगार यांचा हॉटेलचा व्यवसाय असून त्यांच्या परिचयाचे आनंद गंभीर दानी यांनी शेअर मार्केट करता डिमॅट अकाउंट उघडून ट्रेडिंग करण्याकरिता गणेश काळे यांना दिले होते. तेजस पगार यांची गणेश काळे यांच्यासोबत भेट झाल्यानंतर दरमहा सात ते आठ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवल्यानंतर तेजस यांनी पत्नी शरयू पगार यांच्या नावाने डिमॅट अकाउंट उघडले प्रारंभी त्या खात्यामध्ये 25 लाख रुपये भरल्यानंतर तेजस यांनी हे खाते गणेश काळे यांना ट्रेडिंग करण्यासाठी वापरण्यास दिले. त्यानंतर गणेश काळे यांनी जून 2024 मध्ये चांगले मार्केट आहे जास्त गुंतवणूक केल्यास मी नफ्याची रक्कम प्रथम डिमॅट खात्याला लिंक असलेल्या तुमच्या खात्यावर जमा करेन त्या नफ्याच्या रकमेपैकी 40% रक्कम तुम्हाला ठेवून उर्वरित 60 टक्के रक्कम मला द्या तोटा झाला तर 30 दिवसात ती रक्कम डिमॅट खात्यावर भरेल असे आमिषही दाखविले. मात्र जुलै महिन्याच्या शेवटच्या कालावधीपासून गणेश काळे यांनी पत्नी शरयू यांच्या खात्यावर पैसे जमा होत नाहीत, दुसरीकडे पैसे गुंतवले आहेत, अशी कारणे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ केली. तेजस यांच्या आईच्या खात्यावर काही रक्कम जमा करून 39 लाख 77 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

![]()












