ठाकरेंच्या रडारवर कोण असणार ? राजकीय धुरीणांचे लक्ष

नाशिक : विधानसभेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच नाशिक शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ठाकरे गटाच्या शिवसेनेने धक्का दिला असून मनसेचे मोठे नेते व माजी महापौर अशोक मुतडक यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला तर नांदगाव विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अकबर सोनावाला यांनी अचानक निवडणुकीच्या मैदानातून माघार घेत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत महाविकास आघाडीला पाठींबा दिल्याने मनसेला हा मोठा धक्का मानला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज शनिवार (दि 16) सिडको आणि सातपूरमध्ये सभा होत आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार दिनकर पाटील यांच्या प्रचारार्थ या सभा होणार आहेत. सातपूर, अशोकनगर, येथिल शिवजन्मोत्सव मैदान (जाणता राजा) येथे सायंकाळी 5 वाजता तर सिडको, पवननगर स्टेडियम येथे सायंकाळी 7 वाजता सभा होणार आहे. या सभेसाठी जोरदार तयारी केली जात असून नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेने मनसेला धक्का दिल्यानंतर राज ठाकरे यांच्या रडारवर नेमकं कोण-कोण येणार याविषयी नागरिकांमध्ये चर्चा आहे. एकेकाळी नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. हा बालेकिल्ला टिकवण्यासाठी व पश्चिम मतदारसंघ काबीज करण्यासाठी राज ठाकरे पुन्हा एकदा नाशिकच्या मैदानात उतरणार आहेत.


![]()












