तिसऱ्यांदा भाजपने राखला हरियाणाचा गड

नाशिक : आज सकाळपासून हरियाणा आणि जम्मू काश्मीर मध्ये मतमोजणीला सुरवात झाल्यानंतर हरियाणात कॉग्रेस आघाडीवर असल्याचे चित्र असल्याने आपलेच सरकार येणार असे म्हणत कॉग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यास सुरुवात केली कारण सर्वच एक्झिट पोलने देखील कॉग्रेसचीच सत्ता येण्याचे संकेत दिले होते. मात्र तास-दीड तासात संपूर्ण चित्रच बदलले, कॉग्रेसच्या हाता-तोंडाशी आलेला घास भाजपाने एका झटक्यात हिसकावून घेतला. 90 जागांच्या हरियाणा विधानसभेसाठी भाजपाने 49 जागा जिंकत स्वबळावर तिसऱ्यांदा हरियाणात सत्ता काबीज केली. हरियाणाच्या इतिहासात तिसऱ्यांदा सत्ता काबीज करणारा भाजपा हा पहिला पक्ष ठरला. खरतर भाजपा साठी हरियाणाची निवडणूक सोप्पी नव्हती शेतकऱ्यांचे आंदोलन, अग्निवीरांचा प्रश्न,बेरोजगारीचा प्रश्न कॉग्रेसने उपस्थित करत भाजपाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. पण भाजपने शेतकऱ्यांना खूश करण्याचे प्रयत्न सोडले नाहीत. एमएसपी देण्याचे जाहीर करीत भाजपने शेतकऱ्यांना गोंजारले या निवडणुकीत भाजपाने मोठा डाव टाकत मुख्यमंत्री असलेल्या मनोहर खट्टर यांना हटवत त्याठिकाणी एक नवा आणि तरुण चेहरा भाजपने दिला आणि नायब सिंह सैनी यांच्यावर विश्वासही टाकला.महाराष्ट्रातही सध्या महायुतीसाठी फारसं अनुकूल वातावरण नाही. लोकसभा निवडणूक निकालातून हे दिसून आले होते. मात्र भाजपने मागील काही वर्षांत खडतर स्थितीतही काही अनोखे डावपेच आखत सत्ता मिळवण्याचं तंत्र विकसित केलं असल्याने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची लढाई महाविकास आघाडीसाठी सोपी असणार नाही, हे हरियाणाच्या निकालातून स्पष्ट दिसत आहे .त्याचबरोबर लोकसभेत मिळालेल्या यशाने कॉग्रेसमध्ये अति-आत्मविश्वास होता सत्ता आपलीच येणार असे वाटत असल्याने पक्षात मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा वाढली आणि यामध्ये एकमेकांनवर टीका करण्यात आली. आणि आज महाराष्ट्रात देखील विधानसभेच्या तोंडावर महाआघाडीत मुख्यमंत्री पदासाठी देखील मोठी स्पर्धा समोर येत आहे. ही अंतर्गत होणारी स्पर्धाच महाविकास आघाडीला सत्तेच्या खुर्ची पासून दूर नेऊ शकते.मात्र हरियाणाच्या निकालानंतर महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक रंगतदार ठरणार हे निश्चित…

![]()












