कामाच्या ठिकाणी मानसिक छळ कुटूंबाचा आरोप

नाशिक : पाथर्डी फाटा परिसरात राहणाऱ्या विजय सहाने पत्नी ज्ञानेश्वरी सहाने व मुलगी अनन्या या कुटूंबाच्या आत्महत्या संदर्भात भारतीय ट्रेंड युनियन केंद्र या संघटनेने विजय सहाने नाशिकच्या ज्या बॉश कंपनीत काम करत होते त्या कंपनीच्या व्यवस्थापनाची सखोल चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. विजय सहाणे हे मागील 11 वर्षांपासून कंपनीत नोकरीला होते. त्यांना इतर 700 कामगारांसह कंपनीने कामावरून काढून टाकले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सहाने यांच्यासह इतर सर्व कामगारांना पुन्हा कंपनीने रुजू करून घेतले मात्र त्यांना नेहमीचे काम न देता वेगळ्या शेडमध्ये बसवून ठेवले. त्याचबरोबर कामगारांना कामावर घेतल्यानंतर पुन्हा 28 कामगारांना निलंबित तर 237 कामगारांची देशात इतर ठिकाणी बदली केल्याने आपल्याला योग्य न्याय भेटत नसल्याचे पाहून विजय सहाणे हे नैराश्यात गेल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या घटनेने संपुर्ण कुटूंबच उध्वस्त झाले असून ही बाब अत्यंत चिंताजनक व धक्कादायक असल्याचे शासनाला पाठवलेल्या पत्रात भारतीय ट्रेंड युनियन केंद्र या संघटनेचे अध्यक्ष डॉ डी एल कराड यांनी म्हटले असून या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. कुटूंबाची देखील सखोल चौकशीची मागणी आमचे कुटूंब सांप्रदायिक कुटुंब असून जावयांनी असे टोकाचे पाऊल उचलने धक्कादायक आहे. त्यांचा मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप मयताच्या मामांनी केला असून या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. आमदार खोसकरांची मागणी विजय सहाणे यांनी त्यांच्या राहत्या घरी कुटुंबासोबत आत्महत्या केल्यानंतर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी देखील भेट दिली. सहाणे कुटुंबाच्या आत्महत्येनंतर कुटुंबांने केलेल्या आरोपाची सखोल चौकशी व्हावी आणि यासंदर्भात नाशिक पोलिसांनी देखील गांभीर्याने तपास करावा असे निर्देश आमदार खोसकर यांनी दिले. यासंदर्भात अद्याप कंपनीकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नसून पोलीस तपासा नंतरच अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

![]()















