आई व मुलीच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक

नाशिक : देशभरात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र आहे.कोलकाता बलात्कार आणि हत्याच्या घटनेने देशभरात संताप व्यक्त होत असताना बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ राज्यात ठीक-ठिकाणी मोठ्याप्रमाणात आंदोलने केली जात आहेत. मात्र नाशिक शहरातील एका महिलेने व तिच्या मुलीने देशभरातील महिला व मुलींसमोर छेड काढणाऱ्या रोडरोमिओंला भररस्त्यात चोप देत एक आदर्श घालून देत “आपले संरक्षण” आपण स्वतःच केले पाहिजे असा संदेश देखील दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक महिला सिडको परिसरातील पवन नगर भागातील हेडगेवार चौकातील मनपा रुग्णालयात येत असताना त्या वेळी त्याचपरिसरातील बाकावर बसलेल्या टवाळखोरांनी या महिलेची छेड काढली.सुरवातीला बऱ्याचवेळ या महिलेने या घटनेकडे दुर्लक्ष केले.मात्र पुन्हा हा प्रकार घडल्याने महिला संतापली आणि तिने टवाळखोरांना विचारणा केली.त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याचदरम्यान त्या महिलेची मुलगी आणि तिची मैत्रीण दुचाकीवरून आल्या.टवाळखोर आईची छेड काढत असल्याचे बघून मुलीचा संताप अनावर झाला आणि तीने टवाळखोराच्या कानशिलात लगावली. तो टवाळखोर अरेरावी करायला लागल्यावर त्या मुलीने बाजूने जाणाऱ्या भंगारच्या गाडीवरून खुर्ची उचलत त्याने त्या टवाळखोराला चांगलेच चोपले.आई-मुलीचा रुद्रावतार पाहून टवाळखोरांनी तेथून काढता पाय घेतला मात्र या घटनेनंतर आई -मुलीच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी संशयीतांना जेरबंद केले आहे.

![]()











