शहरातील अधिकृत होर्डिंग्जचे 8 महिन्यांपूर्वीच झाले स्ट्रक्चरल ऑडिट, होर्डिंग्जवर पत्रा लावल्यामुळेच घडतात दुर्घटना..

नाशिक: मुंबईत सोमवारी आलेल्या भीषण वादळात घाटकोपर येथील बेकायदा उभारलेले अजस्त्र होर्डिंग पडल्याने झालेल्या दुर्घटनेत मृतांची संख्या 18 च्या वर तर जखमींची संख्या 80 च्या वर गेल्याने राज्यभरातील धोकादायक व अनधिकृत होर्डिंग्जचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे राज्य सरकार व स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. याच प्रकरणाला धरत आज होर्डिंग(जाहिरात फलक) असोसिएशन असलेल्या नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोशियन च्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी सर्वात प्रथम घाटकोपर येथे झालेल्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी घाटकोपर येथे घडलेली होर्डिंग दुर्घटनेमागे असलेली पार्श्वभूमी व नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची असणारी परिस्थिती ही वेगवेगळी असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम कदम यांनी सांगितले. मुख्य म्हणजे नाशिक शहरात खाजगी जागेत लावण्यात आलेले नासिक आउटडोर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोशियन सदस्यांचे सर्व होर्डिंग अधिकृत आहेत त्याचप्रमाणे महापालिकेकडून सर्व कागदपत्रांची पूर्तता करून वेळेवेळी या होर्डिंग्जचे नूतनीकरण करण्यात येते . यावेळी नाशिक महापालिका मान्यताप्राप्त स्ट्रक्चरल इंजिनिअर एजन्सी यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी करून स्ट्रक्चर स्टॅलिबीटी सर्टिफिकेट सादर केल्यानंतर महापालिका जाहिरात फलक उभारण्यास परवानगी देते .यामुळे नाशिक शहरातील सर्वच जाहिरात (होर्डिंग) फलक हे अधिकृत व लायन्सधारक आहेत. त्याचप्रमाणे शासनाने व स्थानिक प्रशासनाने जाहिरातफलकाचा आकारमान ठरवून दिला आहे त्याच आकारमानात नाशिक शहरात जाहिरात फलक असून त्यापेक्षा मोठे जाहिरात फलक नाशिक शहरात नसल्याचे असोसिएशने सांगितले. त्याचप्रमाणे पावसाळ्याव्यतिरिक्त वारंवार वादळाचे प्रमाण वाढले आहे. बदलत्या वातावरणामुळे लोखंड गंजण्याची प्रक्रिया जलदगतीने घडण्याची शक्यता लक्षात घेता व जाहिरात फलकाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नाशिक शहरातील सर्वच जाहिरात फलकांचे स्ट्रक्चरल ऑडिट मागील 8 महिन्यापूर्वीच नाशिक महापालिकेने नेमून दिलेल्या प्रसिद्ध व मान्यताप्राप्त एजन्सीमार्फत करण्यात आले असून त्यात त्या एजन्सीकडून किरकोळ दुरुस्ती सुचविण्यात आल्या होत्या. त्या देखील करून घेण्यात आल्याचे व तसा रिपोर्ट महापालिकेस दिल्याचे कदम यांनी सांगितले. मुख्य म्हणजे नाशिक महापालिका व नासिक आउटडोर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली आणि एकमेव संस्था आहे ज्यांनी मागील पुण्याच्या दुर्घटनेनंतर अगदी कमी कालावधीत सर्वच जाहिरात फलकांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते . यापुढे एक पाऊल पुढे जाऊन कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी नाशिक शहरातील जाहिरात फलकावर कुठल्याही प्रकारचा पत्रा लावण्यात येत नाही. पत्रा लावल्यामुळे हवेचा प्रचंड दाब जाहिरात फलकावर निर्माण होतो. व दुर्घटना घडण्याची शक्यता वाढते. यामुळे याठिकाणी साधे फ्लेक्स लावले जातात. याउलट पुणे, मुंबई, ठाणे परिसरात पत्रा लावल्याने दुर्घटना घडतात, ही पत्रा विरहित जाहिरात फलकांची संकल्पना नाशिक येथून सुरू झाल्याचे देखील असोशिएशनच्या वतीने सांगण्यात आले. त्याचबरोबर पावसाळा सुरू झाल्यावर असोसिएशनच्या वतीने प्रत्येक सदस्यांना जाहिरात फलकांनवरील फ्लेक्स वर होल पाडण्याच्या सूचना करण्यात येतात. त्यामुळे त्या होल मधून हवा पास होण्यास मदत होते व सदर जाहिरात फलकाच्या स्ट्रक्चरला नुकसान होण्याची शक्यता कमी असते . त्याचबरोबर नाशिक आउटडोर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनच्या सर्व सदस्यांना वेळोवेळी सुरक्षिततेसाठी सूचना करण्यात येतात. त्याचबरोबर घाटकोपर येथे पडलेली होर्डिंग दुर्घटनेमागची पार्श्वभूमी वेगळी असून सदर होर्डिंग ही अनाधिकृत म्हणजेच परवानगी घेऊन लावलेली नव्हती. त्याचप्रमाणे हा अनधिकृत जाहिरात फलक दोन्ही बाजूस 120 फूट रुंद 120 फूट एवढा उंच होता .सदर जाहिरात फलकावर पत्रा लावलेला होता. त्यामुळे हवा पास न झाल्याने ते होर्डिंग कोसळले. सदर जाहिरातफलक अनाधिकृत असल्यामुळे त्याचे फाउंडेशन हे सर्वच बाबतीत नियमबाह्य असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहेत. त्याचबरोबर नाशिक आउटडोअर ऍडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने नासिक महानगरपालिकेवर भेदभाव करण्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. एकीकडे नाशिक शहरातील असोसिएशनच्या सभासदांच्या सर्व खाजगी होल्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट झालेले असताना नाशिक शहराच्या रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दिशादर्शक कमानीचे स्ट्रक्चरल ऑडिटचे काय ? नाशिक महानगरपालिकेने स्वतः उभे केलेले होल्डिंग व मनपाने मनपाच्या मालकीच्या जागेत ठेकेदारामार्फत उभारलेले व स्वतः नोटीस देऊन जाहीर केलेले अनाधिकृत जाहिरात फलक याकडे मनपा कानाडोळा का करते ? यांचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे का ? अशी विचारणा असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. त्याचबरोबर शहरातील मध्यवर्ती बस स्थानक सीबीएस परिसरात होर्डिंगचा(जाहिरात फलक) सांगाडा अनेक दिवसांपासून उभा आहे. त्यावर कुठली जाहिरात लागत नसल्याने त्या जाहिरात फलकाचा मेंटेनेस ठेवला जात नसल्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते. याकडे नाशिक महापालिकेचे लक्ष नाही का ?असा सवाल असोसिएशनच्या वतीने करण्यात आला .नाशिक महापालिकेने त्वरित बसस्थानकामधील अनधिकृत जाहिरात फलक हटवावेत अशी मागणी यावेळी असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली.यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम कदम, उपाध्यक्ष इम्तियाज अख्तर, सरचिटणीस गणेश बोडके, नंदन दीक्षित, मच्छिंद्र देशमुख,सचिन गिते, रवी शिरसाठ दीपक पवार ,मनोज केंगे, विराज पवार सौरभ जालोरी बंटी धनंजय, रमेश गीते ,सोमनाथ पाटील, मनीष नाशिककर, नितीन धारणककर गौरव माटे,निखिल सुराणा ,अस्वले आदी सदस्य उपस्थित होते .


![]()











