मध्यप्रदेशातील खरगोन येथून दोन बोगस साधूंना घेतले ताब्यात

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२६ साठी केंद्र आणि राज्य शासनाकडून सुमारे ३४ हजार कोटी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहणाने या भव्य सोहळ्याचा प्रारंभ होणार असून, हा कुंभमेळा पुढील १८ महिने चालणार आहे. या संपूर्ण कालावधीत ३ मुख्य शाही स्नान आणि ४२ पर्व स्नानांचा समावेश असेल. त्यापैकी मुख्य शाही स्नान जुलै ते सप्टेंबर दरम्यान पार पडणार आहेत तर दुसरीकडे भोंदू व बोगस साधूंचा सुळसुळाट वाढल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ओझर परिसरात एका मिठाई व्यावसायिकाला संमोहित करून त्याच्या हातातील सोन्याची अंगठी लंपास करणाऱ्या दोन बोगस नागा साधूंच्या टोळीचा ओझर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्र्यंबकेश्वर येथील भंडारा आणि पूजेच्या नावाखाली दक्षिणा मागण्यासाठी एक बोगस साधू ओझर येथील मिठाईच्या दुकानात आला होता.गल्ल्यावर बसलेल्या दुकानदाराच्या हातातील सोन्याची अंगठी पाहताच त्याने हातचलाखी व संमोहनाचा वापर करून दुकानदाराला नकळत अंगठी काढून घेतली. हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.काही कळायच्या आतच व्यावसायिकाच्या अंगावरील सोन्याचे दागिने गायब झाले आणि भामटे घटनास्थळावरून पसार झाले होते. पण व्यावसायिकाला प्रकार लक्षात येईपर्यंत बराच उशीर झाला होता. तक्रार मिळताच ओझर पोलिसांनी तपास सुरू केला. परिसरातील एक-दोन नव्हे.. तब्बल 40 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. एकेक फुटेज जोडत पोलिसांनी संशयितांचा माग काढला. तपासाची चक्रं थेट मध्यप्रदेशापर्यंत पोहोचली. खरगोल गावात धाड टाकून या 2 तोतया साधूंना बेड्या ठोकण्यात आल्या. चोरीच्या मुद्देमालाचा तपास सुरू असून या टोळीने आणखी कुणाला गंडा घातला का याचाही तपास सुरू करण्यात आला आहे. नाशिक विभागात बोगस साधूंकडून फसवणुकीची ही तिसरी घटना असल्याची माहिती समोर आल्याने नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे

![]()












