
नाशिक : काल मध्यरात्री पासून जोरदार वारे आणि सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला असून, नाशिकच्या पुराची मोजपट्टी असलेला दुतोंडी मारुतीच्या छाती पर्यन्त पाणी आले आहे. पाण्याची पातळी रात्रीतून मोठ्याप्रमाणात वाढल्याने गांधी ज्योत परिसरात दोन नेपाळी पर्यटक अडकले होते. यादरम्यान रामकुंड परिसरात मोठी बचावमोहीम राबवावी लागली. अग्निशमन दल आणि जीव रक्षक दलाच्या जवानांनी धाडसी रेस्क्यू ऑपरेशन राबवत दोघांची सुखरूप सुटका केली. हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला असून, जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून रामकुंड परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. माहितीनुसार, संबंधित पर्यटक रात्री गांधी ज्योत परिसरात थांबले होते. मात्र,रात्री उशिरापासून नदीतील पाणी वेगाने वाढल्याने ते सकाळपर्यंत पुराच्या पाण्यात अडकले. परिस्थिती लक्षात आल्यानंतर त्यांनी मदतीसाठी हाक दिली. वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे पर्यटकांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसत होती. मात्र, बचाव पथकाच्या तत्परतेमुळे दोघांचीही सुखरूप सुटका करण्यात यश आले. सततच्या पावसामुळे गोदावरी नदीची पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना नदीकाठापासून दूर राहण्याचे तसेच सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

![]()












